
राज्यातील इंजिनीअरिंग प्रवेशाकरिता घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटीच्या गणिताच्या पेपरमधील 50 पैकी जवळपास निम्मे म्हणजे 20 ते 25 प्रश्न चुकीचे असल्याची विद्यार्थी-शिक्षकांची तक्रार आहे. चुकीच्या प्रश्नावर आक्षेप नोंदविण्यासाठी प्रतिप्रश्न हजार रुपये सीईटी सेलकडे मोजावे लागतात. प्रश्नसंख्या पाहता फक्त आक्षेप नोंदविण्याकरिता पालकांना 20 ते 25 हजार रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे ही परीक्षाच पुन्हा घेण्याची मागणी होत आहे.
इंजिनीअरिंगच्या प्रवेशाकरिता एकेक गुणाचा कस लागतो. त्यात इतक्या प्रश्नांचा खड्डा पडला तर प्रवेशाचे स्वप्न धूसर होईल या भीतीने प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहे. इतक्या मोठ्या संख्येने प्रश्न चुकल्याने हा घोळ निस्तरता येणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थी-पालकांनी पुनर्परीक्षेची मागणी केली आहे.
पीसीएम गटाकरिता रविवारी (27 एप्रिल) सकाळच्या सत्रात ही परीक्षा घेण्यात आली होती. यात जवळपास अर्ध्या प्रश्नांकरिता दिलेले पर्याय चुकीचे असल्याची तक्रार आहे. राज्यातील विविध ठिकाणी ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र प्रत्येकी 50 आणि गणित 100 अशी 200 गुणांकरिता ही परीक्षा घेतली जाते. यात गणितात एकूण 50 प्रश्न विचारण्यात आले होते. परंतु, जवळपास 20 ते 25 प्रश्नांचे पर्याय चुकीचे आढळून आल्याने विद्यार्थी गोंधळून गेले आहेत.
याबाबत राज्य सरकारने नेमलेल्या सीईटी सेलकडे विचारणा केली असता, सदोष प्रश्नांबाबत अद्याप कुणाची तक्रार आलेली नाही. सदोष प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांना ऑनलाइन तक्रार करता येते. त्यांच्याकडून तक्रारी आल्यानंतर आपण याबाबत निर्णय घेऊन असे सांगण्यात आले.
20 ते 25 हजारांचा भुर्दंड
प्रत्येक प्रश्नाकरिता एक हजार रुपये इतके शुल्क सीईटी सेलकडून घेतले जाते. 20 ते 25 प्रश्नांबाबत आक्षेप नोंदवायचा तर किमान 25 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. आक्षेप योग्य असो वा नसो, हे पैसे परत मिळत नाहीत. त्यामुळे इतके पैसे खर्च करून किती विद्यार्थी आक्षेप नोंदविण्यास पुढे येतील? तसेच, सीईटी सेलच्या चुकांचा भुर्दंड आम्हाला का, असा प्रश्न एका पालकाने केला.