सीईटी परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा! काँग्रेसचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

अभियांत्रिकी प्रवेशासाठी 27 एप्रिल रोजी झालेल्या सीईटी परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यासंदर्भात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पेपरमधील चुकांचे गुणही विद्यार्थ्यांना देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सीईटी सेलच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली होती. पण या परीक्षेतील घोळामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे. अहिल्यानगर जिह्यातील केंद्रावर 50 गुणांच्या गणिताच्या पेपरमध्ये 20 ते 25 प्रश्नांसाठी उत्तराचे पर्याय चुकीचे होते, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असल्याचे सपकाळ यांनी पत्रात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याने त्यांना नाइलाजाने चुकीचे पर्याय निवडावे लागले. याबाबत विद्यार्थ्यांनी केंद्र निरीक्षकांकडे तक्रार केली असता त्यांची साधी दखलही घेतली गेली नाही, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. अशाच प्रकारचा घोळ राज्यातील इतर परीक्षा केंद्रांवर झाल्याच्याही तक्रारी आहेत. काही परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. पण परीक्षा केंद्राकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पेपर काढणाऱ्यांना काळ्या यादीत टाका

पेपर काढणे व परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्था वा पंपनीच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांनी का भोगायची? ज्या संस्थेला पेपर काढता येत नाही, परीक्षांचे नियोजन व्यवस्थित करता येत नाही अशांना पुन्हा कोणत्याही परीक्षेचे काम देऊ नये, त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे.