मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी चार बोटी सज्ज, 13 बोटींचे होणार अद्ययावत यंत्रणांनी नूतनीकरण

‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी विविध प्रयत्न केले गेले. पण सद्यस्थितीत आणखी तगडी व्यवस्था होणे गरजेचे आहे. असे असताना मुंबई पोलिसांच्या ताफ्यात आता अद्ययावत यंत्रणांनी नूतनीकरण केलेल्या चार बोटी लवकरच दाखल होणार आहेत.

मुंबई पोलिसांच्या ताफ्यात सागरी सुरक्षेसाठी पेट्रोलिंग बोटी आहेत. पण बऱ्याच बोटी या नादुरुस्त तसेच बंद पडलेल्या अवस्थेत आहेत.  आता 14 कोटी खर्च करून बंद अवस्थेत असलेल्या 13 बोटींचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी चार बोटी दुरुस्त करून त्यांचे अद्ययावत यंत्रणांनी नूतनीकरण करण्यात आले आहे. या चार बोटी लवकरच सागरी सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यामुळे मुंबई पोलिसांची सागरी गस्त घालण्यासाठी ताकद वाढणार आहे.

शिवाय उर्वरित बोटी अद्ययावतपणे नूतनीकरण करून त्या सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात पोलीस दलात पुन्हा दमदारपणे गस्त घालण्यासाठी दाखल होणार आहेत. याशिवाय लवकरच खलाशी पोलीस भरतीदेखील करण्यात येणार आहे. तसेच नवीन 20 पेट्रोलिंग बोटी खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने 118 कोटींचीदेखील तरतूद केली आहे. त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.