ईडीने स्वत:चेच कार्यालय जाळून घेतले, सब गोलमाल है; हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर हल्ला

ईडीने स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले. आता कुठलेच पुरावे नाहीत हा कांगावा करण्याकरिता आग लावून हे मोकळे झाले आहेत असा हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर आज केला. राजकीय कारस्थान कसे असते याचा हा अत्यंत दुष्ट नमुना आहे. सब गोलमाल है भाई सब गोलमाल है, सीधे रस्ते की ये टेढी चाल है असे म्हणण्याचा प्रसंग शेवटी आलाच, असे सपकाळ म्हणाले.

कुठल्याही कागदाला धक्का लागलेला नाही!

ईडीच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या आगीबद्दल आज संशयाचा धूर निघाला. ही आग जाणीवपूर्वक लावली गेली असावी असा आरोप झाला. त्यावर फडणवीस यांनी सारवासारव करताना तिथली कागदपत्रे सुरक्षित आहेत असा दावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना, ईडीच्या कार्यालयाला आग लागली असली तरी तिथली कागदपत्रे सुरक्षित आहेत, कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही, असे स्पष्ट केले. आपण ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी कार्यालयातील प्रत्येक कागद सुरक्षित आहे असे सांगितले आणि त्या कागदपत्रांचे मिरर इमेजिंग स्टोरेजदेखील आहे, असे फडणवीस म्हणाले.

आग लावली असेल

आग लावली का लागली हे परमेश्वराला माहिती, पण कालचक्र उलटे फिरून आले ना? शॉर्ट सर्किटमुळे मंत्रालयाला लागलेली आग जणू काय त्या वेळचे मुख्यमंत्री यांनीच सहाव्या मजल्यावर जाऊन लावली होती अशी बोंबाबोंब त्यावेळचे विरोधी पक्ष आणि आत्ताचे सत्ताधारी करत होते. त्यांचे पूर्वी दुसरीकडे असलेले नेते, ईडीत अडपून सत्ताधारी पक्षात गेले. त्यामुळे संशयाला जागा आहे. त्यामुळे आग लावली असेल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

ईडी कार्यालयातील आग विझवायला वेळ का लागला? कोणत्या फायली जळाल्या?

ईडीच्या कार्यालयात लागलेल्या आगीबद्दल संशयाचा धूर निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनीही, या आगीवर पहिल्या पंधरा मिनिटांत नियंत्रण मिळवण्यात का अपयश आले? नक्की कोणत्या फाईल्स जळाल्या, असा खोचक सवाल आज केला. ईडीचे कार्यालय असलेल्या परिसरात वर्दळ नसल्याने ओपन स्पेस आहे. असे असताना आग विझवण्यासाठी वेळ का लागला? त्या इमारतीमध्ये फायर सुरक्षा नव्हती का, असे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले. या आगीत जी कागदपत्रे जळाली असा दावा केला जात आहे, त्याचा बॅकअप आहे का अशी विचारणा करतानाच, ज्या फाईल्स जळाल्या असतील त्याचा बॅकअप असणे आवश्यक आहे. बॅकअप नसेल तर ते धक्कादायक ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

हेरिटेज दर्जामुळे ईडीच्या इमारतीचे फायर ऑडिटच झाले नाही

पर्ह्ट परिसरातील बेलॉर्ड इस्टेटमधील ईडीची पैसर-ए-हिंद ही इमारत 100 वर्षांपेक्षा जुनी असल्यामुळे ती हेरिटेज वास्तूत मोडते. त्यामुळे अशा हेरिटेज वास्तू असलेल्या इमारतीचे फायर ऑडिट करता येत नाही. गरज पडल्यास या इमारतीचेही फायर ऑडिट नंतर केले जाईल, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली. ईडीच्या इमारतीला लागलेल्या आगीत मोठय़ा प्रमाणात कागदपत्रे, फायली, संगणक, फर्निचर जळून खाक झाले आहे. दरम्यान, ईडीनेही महत्त्वाची कागदपत्रे, फायली जळून खाक झाल्याचे मान्य केले आहे. मात्र, या सर्व फायली डिजिटल स्वरूपात सुरक्षित आहेत, असे ईडीने आज स्पष्ट केले आहे.