भरधाव टेम्पोने पाच गाडय़ांना उडवले, अंधेरी-वांद्रे दरम्यान दिवसभर कोंडमारा!

पश्चिम द्रुतगती मार्गावर आज घडलेल्या दोन अपघातांमुळे अंधेरी पूल परिसरात प्रवाशांचा प्रचंड कोंडमारा झाला. यामध्ये गुंदवली अंधेरी येथे रस्त्यावर टेम्पो उलटला तर गुंदवली फ्लायओव्हर येथे एका टेम्पोने पाच ते सहा गाडय़ांना उडवल्याने कामावर येणाऱ्या चाकरमान्यांची शेकडो वाहने अडकून पडल्याने त्यांना ‘लेटमार्क’ लागला. या वाहतूक कोंडीत अँब्युलन्सही अडकून पडल्या. शिवाय प्रवाशांचे प्रचंड हालही झाले. अखेर पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर पाच ते सहा तासांच्या प्रयत्नानंतर या मार्गावरून वाहतूक सुरू झाली. मात्र ही वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.