
पुलवामा आणि पहलगाम प्रकरणानंतर मोदी-शहांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. अमित शहा तर सगळ्यात अपयशी गृहमंत्री आहेत. कारस्थानी, व्यापारी वृत्तीच्या माणसाने संवेदनशील अशा गृहमंत्रीपदावर बसणे हा देशाला धोका आहे आणि अशा व्यक्तीला त्या पदावर बसवणे हा राष्ट्रीय अपराध आहे. या अपराधाची किंमत देश चुकवत आहे. कश्मीरात 26 बळी गेल्यावरही ज्या देशाचे पंतप्रधान चोवीस तासांत बिहारातील निवडणूक प्रचारात सहभागी होतात व तेथून पाकड्यांना इशारे देतात, त्यांचे राष्ट्रीयत्व म्हणजे ढोंग आहे!
पहलगाम दहशतवादी हल्ल्याने भारतातील सत्ताधारी पक्षांचा राष्ट्रवादाचा फेस फसफसून बाहेर येत आहे व ते इतरांच्या राष्ट्रवादावर, देशभक्तीवर प्रश्न विचारू लागले आहेत. मराठीत यासाठी दोन वाप्रचार आहेत. एक म्हणजे ‘चोराच्या मनात चांदणे’ आणि दुसरा म्हणजे ‘खाई त्याला खवखवे’. भाजप वगैरे पक्षांची अवस्था नेमकी तशीच झाली आहे. दाऊद इब्राहिम, इक्बाल मिर्ची या लोकांशी व्यापार करणाऱ्यांना व त्यांना आपल्या पक्षात स्थान देणाऱ्यांच्या तोंडी ‘राष्ट्रवाद’ वगैरे शब्द शोभत नाहीत. पाकिस्तानने हल्ला करून आमचे पाच-पंचवीस हिंदू मारल्याशिवाय यांच्या राष्ट्रभक्तीला कधीच फेस येत नाही. उरी, पठाणकोट, पुलवामा आणि आता पहलगामचा हल्ला याचे ज्वलंत उदाहरण आहे. हे हल्ले झाले व त्यात आमचे जवान, नागरिक मारले गेले तेव्हा दुश्मनांना धडा शिकवायची भाषा केली गेली. दहा वर्षे हे सत्तेवर आहेत. मग या दहा वर्षांत दुश्मनांचा बंदोबस्त करण्यासाठी यांनी काय केले? आणि आताही पाकड्यांचा बदला घेण्यासाठी भाजपच्या तोंडाळ फौजा सीमेवर जाऊन शौर्य दाखवणार नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. पहलगामचा बदला घेऊ, असे पिचक्या मांड्यांवर थापा मारून रोजच सांगितले जात आहे. सिंधू नदीचे पाणी थांबवू म्हणजे पाकिस्तान पाण्याशिवाय तडफडून मरेल, पण हा ‘पाणीबॉम्ब’ इतक्या सहजतेने टाकता येत नाही व सिंधूचे पाणी अडवण्यासाठी मोठी धरणे बांधावी लागतील. पण लोकांना मूर्ख बनवायचे, बनवत राहायचे. पाकिस्तानशी क्रिकेट खेळणार नाही, असाही धुरळा उडवला आहे, पण दोनेक महिन्यांपूर्वी एक वर्ल्ड कप दुबईत झाला तेव्हा जय शहा, महाराष्ट्रातून मिधेंची पोरे, इतर मंत्र्यांची पोरे, भाजप पुढारी हे दुबईतील शेखांच्या बगलेत बसून, पाकडय़ा खेळाडूंना बाजूला बसवून
पाक-भारत क्रिकेट
सामन्यात राष्ट्रवादाला ‘चार चांद’ लावत होते हे काय देशाने पाहिले नाही? हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘‘भारत-पाक क्रिकेट होणार नाही, होऊ देणार नाही’’ असा इशारा देताच पाकड्यांची तणतणली होती. ‘तुम्ही कश्मीरात आमच्या हिंदूंचे मुडदे पाडायचे आणि भारताने मुडदे पाडणाऱ्यांशी क्रिकेट खेळायचे हे ढोंग चालणार नाही,’ ही शिवसेनाप्रमुखांची तेव्हा भूमिका होती. मात्र बाळासाहेबांचे मन वळवायला तेव्हा ‘भाजप’ परिवार मुंबईत धावला. ‘‘साहेब, राजकारणात धर्म आणि खेळ आणू नका. राजनैतिक संबंध ठेवावे लागतात. जरा सबुरीने घ्या,’’ अशी वकालत तेव्हा करणारे आज पाकड्यांच्या दिल्लीतील वकिलाती बंद करीत आहेत आणि त्यांच्याशी क्रिकेट खेळू नये असे बोलत आहेत. जय शहा हे सध्या दुबईतच असतात. त्यांच्याप्रमाणे अनेक ‘राष्ट्रभक्त’ भाजपवाल्यांची पोरे धंदापाणी करण्यासाठी आणि भारतातील लुटीचा पैसा जिरवण्यासाठी दुबई, सिंगापूर, मॉरिशस येथे आहेत व तेथून ते कश्मीरातील हल्ल्याचा निषेध करीत आहेत. पाकिस्तानला धडा शिकवा, असे सांगत आहेत. अरे थोर राष्ट्रभक्तांनो, इतकेच राष्ट्रप्रेम उफाळून जात होते तर मग स्वदेश सोडून परदेशी का गेलात? वीर सावरकरांचे हृदय ज्याप्रमाणे मातृभूमीच्या ओढीने तळमळत होते, तसे तुमचे हृदय फक्त भारतावर हल्ला झाला तरच तळमळते किंवा डचमळते काय? देशासाठी मर मिटायचे भारतातील पोरांनी आणि भाजपवाल्यांच्या पोरांनी परदेशात सुखी आणि सुरक्षित जीवन जगायचे? आमची तर भारत सरकारकडे राष्ट्रीय प्रेमाची मागणी आहे. राष्ट्रभक्तीचा फेस असा फसफसू लागलाच आहे तर एक करा, भाजप आणि संघ परिवारात ज्या शूर वीरांचे बाहू आणि मनगटे आज फुरफुरत आहेत व
‘युद्ध करा’ असा धोषा
जे लावीत आहेत, त्यापैकी किती जणांनी विदेशी बायका केल्या व किती जणांची पोरे नोकरीधंद्यासाठी परदेशी भूमीत कायमची स्थिरावली आहेत, किती जणांनी परदेशात इस्टेटी केल्या त्यांची यादी जाहीर करा. एवढेच नव्हे तर ज्यांची पोरे विदेशात व बायको विदेशी आहे अशांना भारतात सत्तेचे पद मिळणार नसल्याचा कायदाच करा. विदेशातल्या या सर्व पोरांना बोलवून सक्तीचे सैन्य प्रशिक्षण देऊन सीमेवर पाठवा. मग त्यांना कळेल, देशभक्ती म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे नाहीत. सध्या भाजप काळात देशभक्तीचे जे ढोंग वाढले आहे, त्यामुळे देशातील राष्ट्रवादाचा पायाच भुसभुशीत झाला आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली देशात अनेक ‘सेना’ व ‘संघटना’ स्थापन होऊन त्या धर्माच्या नावाने हैदोस घालीत आहेत. या शूरांनादेखील अर्जुन पुत्र अभिमन्यूप्रमाणे शत्रूशी लढण्यासाठी रावळपिंडी, इस्लामाबाद, लाहोर, कराचीला पाठवायला हवे. भारतीय जवान अत्यंत कठीण परिस्थितीत कश्मीरात व सीमेवर काम करीत आहेत. मात्र त्यांनाही भारतातील घाणेरडय़ा राजकारणात ओढले जात आहे. पुलवामात 40 जवान मारले तेव्हाही पाकड्यांचा बदला घेतला नाही, तर फक्त राजकारण केले व आता पहलगामच्या बाबतीतदेखील तोंडच्या वाफाच दवडल्या जात आहेत. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रभक्तीचा फुगा आहेत व गृहमंत्री अमित शहा हे रोज वितळणारा मेणाचा पुतळा आहेत. त्यांना ‘लोहपुरुष’ म्हणणाऱ्यांची आम्हाला कीव येते. पुलवामा आणि पहलगाम प्रकरणानंतर मोदी-शहांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. अमित शहा तर सगळ्यात अपयशी गृहमंत्री आहेत. कारस्थानी, व्यापारी वृत्तीच्या माणसाने संवेदनशील अशा गृहमंत्रीपदावर बसणे हा देशाला धोका आहे आणि अशा व्यक्तीला त्या पदावर बसवणे हा राष्ट्रीय अपराध आहे. या अपराधाची किंमत देश चुकवत आहे. कश्मीरात 26 बळी गेल्यावरही ज्या देशाचे पंतप्रधान चोवीस तासांत बिहारातील निवडणूक प्रचारात सहभागी होतात व तेथून पाकड्यांना इशारे देतात, त्यांचे राष्ट्रीयत्व म्हणजे ढोंग आहे!