Tahawwur Rana तहव्वूर राणाची NIA कोठडी 12 दिवसांनी वाढवली

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाच्या एनआयए कोठडीत 12 दिवसांची वाढ करण्यात आली. राणाला आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले होते.

राणावर काय आरोप?

राणा हा लश्कर ए तोयबाचा दहशतवादी असून मुंबईवरील हल्ल्यापूर्वी येथील संभाव्य लक्ष्यांची टेहाळणी करण्याची जबाबदारी डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद सैयद गिलानीवर सोपवण्यात आली होती. हेडलीचा मुंबई दौरा व्यावसायिक कामासाठी दाखवण्यात आला. राणाचा इमिग्रेशन व्यवसाय होता. त्याचाच आधार घेऊन त्याच्या  कंपनीची एक शाखा मुंबईतील ताडदेव परिसरात सुरू होत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. मुंबईत एक इमिग्रेशन सेंटर उभारण्यात आले. त्याच कामासाठी हेडली मुंबईत यायचा. त्याने इमिग्रेशन सेंटरचा कर्मचारी म्हणून व्हिजिटिंग कार्डेही छापली होती, पण सुरक्षा यंत्रणांच्या तपासात या इमिग्रेशन सेंटरमध्ये इमिग्रेशन, व्हिसा किंवा इतर कोणतेही काम झाल्याचे आढळले नाही. एनआयएने याप्रकरणी 25 डिसेंबर 2011 रोजी आरोपपत्र दाखल केले होते.