Bhandara News – मुंबई कोलकाता महामार्गावर भरधाव बोलेरोची ट्रकला धडक, चौघांचा मृत्यू

भरधाव बोलेरोने ट्रक धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना भंडाऱ्यात घडली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मुंबई-कोलकाता महामार्गावरील भंडारा शहराजवळ रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोलेरो वाहन रायपूरहून नागपूरकडे चालले होते. वाहनात चालकासह पाच जण होते. रात्रीच्या सुमारास भंडाऱ्यातील बेला गावाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवायला जाण्यासाठी चालक महामार्गावरून वाहन वळवत होता. यादरम्यान नागपूरकडून येणाऱ्या भरधाव ट्रकवर बोलेरो वाहन आदळले.

अपघातात बोलेरोचा चक्काचूर झाला. यात गाडीतील चौघांचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच भंडारा पोलीस आणि गडेगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने महामार्गावरुन हटवत वाहतूक पूर्ववत केली.