त्यांचे कृत्य इसिसच्या दहशतवाद्यांसारखे, ते आपल्याशी बरोबरी करूच शकत नाही; असदुद्दीन ओवैसी पाकिस्तानवर संतप्त

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेबाबत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचे कृत्य इसिसच्या दहशतवाद्यांसारखे आहे. पाकिस्तान हिंदुस्थानपेक्षा 50 वर्षे मागे आहे. त्यांच्या देशाचे बजेट आपल्या लष्करी बजेटइतकेही नाही. त्यामुळे पाकिस्तान आपल्याशी कधीही बोरबरी करू शकत नाही, असे ओवैसी म्हणाले.

ओवैसी यांनी पाकिस्तानी नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या अणुहल्ल्याच्या दर्पोक्तीवरही टीका केली. पाकिस्तान नेहमीच अणुशक्तीसंपन्न देश असल्याच्या बाता मारतो. मात्र, त्यांनी कोणत्याही देशात घुसून निष्पाप लोकांना मारले तर कोणताही देश गप्प बसणार नाही. मग देशात कोणाचेही सरकार असो, असा इशाराही त्यांनी पाकड्यांना दिला. आमच्या देशात घुसखोरी करत निष्पाप लोकांवर हल्ले करणे कोणत्या धर्मात मान्य आहे, असा सवालही त्यांनी केला.

या हल्ल्या विरोधात कश्मीरी जनतेनेही आवाज उठवला आहे. या हल्ल्यात खेचर मालक असलेल्या एका कश्मीरी नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. तसेच घटनेनंतर पर्यटकांना मदत करणारे कश्मीरीच होते. कोणताही कश्मीरी दहशतवादाला किंवा दहशतवाद्यांना पाठिंबा देत नाही. या घटनेविरोधात सर्व देश एकत्र आहे, असेही ते म्हणाले.