उन्हाळी सुट्टीच्या हंगामातही एसटीच्या उत्पन्नात वाढ होईना!

उन्हाळी सुट्टीत मोठय़ा प्रमाणावर मुंबईकर एसटीने गावी जातात. त्यामुळे सुट्टीच्या हंगामात एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होते. यंदा मात्र जनतेवर मोठी भाडेवाढ लादूनही एसटी महामंडळाच्या उत्पन्नाचा आलेख घसरत चालला आहे. भाडेवाढीमुळे उत्पन्नात भर पडण्याऐवजी महामंडळाच्या तिजोरीत दरदिवशी तीन ते चार कोटी रुपयांची घट झाली आहे.

एसटी महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महायुती सरकारने मोठी भाडेवाढ लागू केली. त्यानंतर एप्रिल महिन्यातील भाडेवाढीच्या पटीत उद्दिष्टांप्रमाणे प्रतिदिन सरासरी 33 कोटी 65 लाख इतके उत्पन्न मिळायला हवे होते. पण प्रत्यक्षात प्रतिदिन 29 कोटी 80 लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. ऐन उन्हाळी सुट्टीच्या हंगामात उत्पन्नामध्ये तीन ते चार कोटींनी घट झाली आहे.

कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

एसटीचे चालक-वाहक तसेच इतर कर्मचारी उन्हातान्हात प्रचंड मेहनत घेतात. मात्र वरिष्ठ अधिकारी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीत नाहीत. अशा कामचुकार अधिकाऱयांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.