
नीट या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा पेपर फुटल्याची बतावणी करत विद्यार्थी-पालकांना प्रवेशाची हमी मिळवून देणाऱ्या यूटय़ूबर्स आणि रीलवाल्यांचा सुळसुळाट चांगलाच वाढला आहे. या फसव्या दाव्यांपासून विद्यार्थी-पालकांना वाचविण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) प्रथमच स्वतंत्र प्लॅटफॉर्मची निर्मिती करत या ठिकाणी तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे. यंदा नीट 4 मे रोजी होणार आहे.
गेल्या वर्षी नीटचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. या वेळेसही नीटची प्रश्नपत्रिका फुटल्याचे दावे विविध समाजमाध्यमांवरून केले जात आहेत. एनटीए किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून विद्यार्थ्यांना पेपर मिळवून देण्याचे फसवे दावे केले जात आहेत. यापासून सावध राहण्याचे आवाहन एनटीएचे संचालक प्रदीप सिंग खरोला यांनी केले आहे.
नीटबाबत केले जाणारे हे दावे खोटे असून अशा संशयितांविरोधात तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधितांविरोधात सार्वजनिक परीक्षा, (अनुचित मार्ग प्रतिबंध) कायदा – 2024 अंतर्गत कारवाई करण्यात येईल. एनटीएच्या वेबसाईटवर या तक्रारी नोंदविता येतील.