
महायुतीमधील बेबनाव आज पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. महाराष्ट्रातील 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला, तर त्यावर भाष्य करताना ‘एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही’ असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावरून शिंदे-फडणवीस यांच्यात पहलगामच्या मुद्द्यावरून समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर कश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी एकनाथ शिंदे कश्मीरमध्ये गेले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांना विश्वासात न घेताच त्यांनी थेट कश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला होता अशी त्या वेळी चर्चा होती. त्याच वेळी शिंदे यांना श्रेय मिळू नये म्हणून फडणवीस पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील नागरिकांच्या घरी त्यांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले होते.
आता महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याच्या मुद्द्यावरही शिंदे-फडणवीस यांच्यात एकवाक्यता नसल्याचे दिसून आले आहे. पाकिस्तानी नागरिकांची यादी मिळवून त्यांना बाहेर काढण्याचे आदेश फडणवीस यांनी पोलिसांना दिले. आज शिंदे यांनी बुलढाणा येथील सभेमध्ये बोलताना महाराष्ट्रातील 107 पाकिस्तानी बेपत्ता असून पोलीस त्यांना शोधून काढतील असे वक्तव्य केले. त्यावर फडणवीस यांना खुलासा करावा लागला. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘महाराष्ट्र सोडण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना 28 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मी गृहमंत्री म्हणून सांगतो की, एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही. सगळे बाहेर चालले आहेत. सगळ्यांना बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.’