
छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठेपण ज्यामुळे अधोरेखित होते त्या मुघल साम्राज्याचा इतिहासच एनसीआरटीईच्या सातवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांतून वगळण्यात आला आहे. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासाला एनसीईआरटीईच्या (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) पाठ्यपुस्तकांतून न्याय कसा मिळणार, असा प्रश्न आहे. दुसरीकडे महाकुंभ, बेटी बचाओ, मेक इन इंडियासारख्या केंद्रीय योजनांचा समावेश करत त्यांची भलामण करण्यात आली आहे.
भाजपाने पाठ्यपुस्तक पुनर्रचनेचा अजेंडा राबवीत पुस्तकांतील अनेक जुन्या संदर्भांना केंद्राची कात्री लागली आहे. त्याऐवजी तीर्थक्षेत्रे, 12 ज्योतार्लिंगे, चारधाम यात्रा, शक्तिपीठ, भारतीय राजवंश, महाकुंभ, मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ, बेटी पढाओसारख्या सरकारी उपक्रमांचा समावेश केला गेला आहे. हा पाठ्यपुस्तकाचा पहिला भाग आहे. दुसरा भाग येत्या काही महिन्यांत येईल. मात्र त्यात वगळलेले भाग कायम ठेवले जाणार की नाही, याबाबत एनसीईआरटीने खुलासा केलेला नाही.
कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचा उल्लेख नाही
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचा आणि त्यात सुमारे 66 कोटी लोकांच्या सहभागाचा उल्लेख आहे. परंतु चेंगराचेंगरीत 30 यात्रेकरूंच्या झालेल्या मृत्यूविषयी चकार शब्द नाही.
हे वगळले
तुघलक, खिलजी, मामलुक आणि लोदी यांचे तपशीलवार वर्णन. मुघल सम्राटांच्या कामगिरीवरील दोन पानांचा तक्ता.
याचा समावेश
मगध, मौर्य, शुंग आणि सातवाहन यांच्यावरील प्रकरणे. भारतीय नीतिमत्ता. इस्लाम, ख्रिश्चन, यहुदी, झोरास्ट्रियन, हिंदू, बौद्ध आणि शिखांची पवित्र स्थळे, तीर्थक्षेत्रे, 12 ज्योतार्लिंगे, चारधाम यात्रा, शक्तिपीठ, नद्यांचे संगम, पर्वत आणि जंगले यासारखी पुजनीय ठिकाणे. मेक इन इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ आणि अटल टनेल.