
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिका मुख्यालय यांचा परिसर हा देशविदेशातून मुंबईत येणाऱ्या पर्यटकांच्या सर्वाधिक आकर्षणाचा भाग असतो. पुरातन वारसास्थळ असलेला हा परिसर आणखी चांगल्या प्रकारे न्याहाळता यावा यासाठी मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील क्रीडा भवनाच्या जागेचा पुनर्विकास करण्यात येणार असून त्या ठिकाणी भव्य टाऊनहॉल इमारत उभारली जाणार आहे. यात नगर सभागृह, काचेचे घुमट, व्हिविंग गॅलरी, काचेची कॅप्सूल लिफ्ट, रूफ टॉप कॅफेटेरिया, 60 वाहनांसाठी पार्किंगची सुविधा असणार आहे. दरम्यान, यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका मुख्यालय व सभोवतालचा संपूर्ण परिसर हा मुंबईतील महत्त्वाच्या वारसाजतन प्रसीमा (हेरिटेज प्रीसिंक्ट) मध्ये समाविष्ट आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या संकल्पनेनुसार आणि निर्देशानुसार, महापालिका मुख्यालय इमारतीसमोर असलेल्या पालिका क्रीडा भवन जागेचा पुनर्विकास करून ही टाऊनहॉल इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
अशी असेल इमारत
संपूर्ण इमारत तळमजला अधिक पाच मजल्यांची असणार आहे. ही वास्तू साकारताना सभोवतालच्या पुरातन वारसा (हेरिटेज) वास्तू लक्षात घेऊन या टाऊनहॉल इमारतीची उंची ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुरातन वारसा इमारतींच्या सौंदर्याला बाधा पोहोचणार नाही तसेच सभोवतालचा परिसरही योग्य प्रकारे न्याहाळता येईल. इमारतीची एपंदरीत रचना व बाह्य सजावट ही सभोवतालच्या वारसा जतन प्रसीमेला साजेशी करण्यात येणार आहे.
महालक्ष्मी रेसकोर्समध्ये पालिकेचे क्रीडाभवन
सध्याचे महापालिका क्रीडा भवन महालक्ष्मी रेसकोर्स येथे हलवण्यात येणार आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकरिता वाढीव, सुसज्ज व अत्याधुनिक क्रीडा सुविधा असणारे क्रीडा भवन हे महालक्ष्मी रेसकोर्स जवळील तुळशीवाडी येथे बांधण्यात येणार आहे. तेथे येण्यासाठी उपनगरीय रेल्वे, मुंबई किनारी रस्ता यांचीही सुविधा आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना तेथे येऊन सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या क्रीडा भवनामध्ये बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस, अत्याधुनिक व्यायामशाळा तसेच जलतरण तलाव इत्यादी सुविधांचा समावेश असणार आहे.