
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान सरकारने कठोर भूमिका घेत सिंधु जल करार रद्द केला. त्यानंतर पाकिस्तानने जळफळाट करत या कारवाईकडे युद्ध म्हणून बघितले जाईल असा इशारा दिल्यानंतर हिंदुस्थानने उरी धरणातून जादा पाणी सोडून पाकिस्तानवर वॉटरस्ट्राइक केला. त्यामुळे झेलम नदीला पूर आला असून मुझफ्फराबादमधील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. अक्षरशः पूर आल्यामुळे आणि घरे बुडाल्यामुळे लोक घरे सोडून पळाले. पुरामुळे हाहाकार उडाल्याने पाकिस्तान सरकारने पीओकेत आणीबाणी जाहीर केली असून हिंदुस्थानच्या नावाने आगपाखड सुरू केली आहे.
मुझफ्फराबादमधील हट्टिन बाला परिसराला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. हिंदुस्थान सरकारने कुठल्याही प्रकारचा इशारा न देता उरी धरणातून अचानक अधिक पाणी सोडल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. जिकडे तिकडे पुराच्या पाण्याने धुमाकूळ घातल्याने घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जा असे आवाहन भोंग्यांच्या माध्यमातून केले जात आहे, अशी माहिती मुझफ्फराबादमधील चकोटी येथील स्थानिक नागरिकांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. अचानक पाणी गावात धडकल्याने जीव वाचवण्यासाठी आणि शक्य त्या गोष्टी वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याचे दमेल येथील रहिवासी मोहम्मद आसिफ यांनी सांगितले.
नदीकाठच्या रहिवाशांना धोक्याचा इशारा
पाकव्याप्त कश्मीरमधील झेलम नदीच्या काठी राहणाऱया नागरिकांना मुझफ्फराबाद जिल्हा प्रशासनाने इतर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे आणि मासेमारी टाळावी असे आवाहन केल्याची माहिती, जिल्हा प्रशासनाच्या प्रवक्त्याने प्रसारमाध्यमांना दिली. कोहला आणि ढालकोट येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती प्रवक्त्याने दिली. मात्र कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नसल्याचेही स्पष्ट केले.
दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचा कट रचणाऱयांना कठोर शिक्षा मिळेल
26 नागरिकांच्या हत्येला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना आणि हा कट रचणाऱयांना कठोर शिक्षा दिली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’मधून ठणकावले.
देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नसते
देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नसते, देशाच्या एकतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. याचा भाजपला फायदा होईल म्हणतात ते निवडणूक होईल तेव्हा बघू, असेही पवार म्हणाले.