रेल्वे मार्गावरील धोकादायक झाडांच्या छाटणीला वेग; पालिका, रेल्वेची कार्यवाही

पावसाळ्यात धोकादायक ठरणाऱ्या मोठ्या झाडांच्या छाटणीबरोबर रेल्वे मार्गात अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या छाटणीच्या कामाला वेग आला असून आज विद्याविहार ते मुलुंड पूर्व आणि पश्चिम भागात रेल्वे मार्गाजवळील झाडांची छाटणी करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांच्यासह रेल्वे कर्मचारी या कार्यवाहीत सहभागी झाले होते.

रेल्वे विभागामार्फत विद्याविहार ते दिवा स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रशासनामार्फत सहाव्या लाईनवर मेगाब्लॉक आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्यावतीने आज एन विभाग, टी विभाग आणि एस विभागात विद्याविहार ते मुलुंड पूर्व व पश्चिम बाजूस रेल्वे ट्रकजवळ खासगी व महापालिका हद्दीमध्ये असणाऱ्या वृक्षांची छाटणी करण्याचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसोबत विभागातील उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली होती.

दिवसभरात 200 झाडांची छाटणी

विद्याविहार ते मुलुंड दरम्यान 3 विभागांमध्ये रेल्वे ट्रक शेजारील वृक्षांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी करण्यात आली. या छाटणीकरिता 40 ते 50 वृक्षछाटणी करणारे कर्मचारी व सुपरवायझर तसेच संबंधित कनिष्ठ वृक्ष अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी तैनात करण्यात आले. मध्य रेल्वे प्रशासनातील कर्मचारी यांच्या देखरेखीखाली वृक्ष छाटणीचे काम सुरू असून दिवसभरामध्ये 50 ते 200 वृक्षांची छाटणी करण्यात आली.

दुर्घटनांना आळा बसणार

पावसाळ्यात, वादळ वाऱ्यात रेल्वे ट्रक शेजारील वृक्ष उन्मळून पडतात, फांद्या तुटतात. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होतो तसेच वृक्ष रेल्वेवर पडून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुर्घटनांना आळा घालण्यासाठी वृक्ष छाटणीची ही मोहीम मोठी महत्त्वाची असते.