
वर्ष 2024-2025 सालचे आरे दूध केंद्राचे भाडे स्वीकारावे, आरे स्टॉलचे नूतनीकरणाबाबत सरकारने जीआर काढावा, आरे दूध व दुग्धजन्य पदार्थाचे वितरण बंद झाल्यामुळे आरे स्टॉल महानंदाला हस्तांतर करण्याचे विचाराधीन आहे, त्याची माहिती सरकारने द्यावी. त्याचबरोबर आरे केंद्र चालकाला मदतनीस नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, त्याची नियमावली अद्याप प्रशासनाने कळवली नाही ती तातडीने कळवावी, अशी मागणी महाराष्ट्र दूध वितरक सेनेची सरकारकडे केली आहे.
महाराष्ट्र दूध वितरक सेनेची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शिवसेना भवन येथे झाली. संघटनेचे प्रमुख सल्लागार शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार कार्याध्यक्ष राम कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आरे केंद्रचालकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. सूत्रसंचालन उपाध्यक्ष सुहास शिवडवकर, तर इतिवृत्त वाचन संघटनेचे सरचिटणीस सतीश सावंत यांनी केले. यावेळी खजिनदार विलास भुजबळ, सचिव रेखा संखे, सहकार्याध्यक्ष आदिनाथ हिरवे, सरचिटणीस सतीश सावंत, कोषाध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष चंद्रकांत झगडे, सहसरचिटणीस प्रदीप इनामदार, उपाध्यक्ष तानाजी आरज, रवींद्र पास्टे आदी उपस्थित होते.