
महाराष्ट्रात वाघांच्या मृत्यूचे प्रमाण झपाटय़ाने वाढल्याची चिंताजनक वस्तुस्थिती समोर आली आहे. मागील चार महिन्यांत देशात 62 वाघांचा मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक महाराष्ट्रात 20 वाघांना प्राण गमवावा लागला. एकीकडे पट्टेदार वाघांची संख्या वाढत असल्याचा दावा केला जात आहे.
दुसरीकडे वाघांचा मृत्युदर वाढल्याने वन्यप्राणीप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशात 4 महिन्यांत 17 वाघांचा मृत्यू झाला. सरकारने वाघांच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलणार असल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात वाघांच्या शिकारीचे प्रकार नियंत्रणात आलेले नाहीत. त्यामुळे वाघांचा मृत्युदर वाढल्याची गंभीर आकडेवारी समोर आली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नुकतीच व्याघ्रमृत्यूची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार देशभरात 1 जानेवारी ते 26 एप्रिल या चार महिन्यांत 62 वाघांचा मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आढळले. वन्यजिवांच्या झुंजी, शिकार, अपघात आणि नैसर्गिक मृत्यू अशा विविध कारणांनी वाघांच्या संख्येत चिंतनीय घट झाली आहे. राज्यात मागील पाच वर्षांत 41 वाघ आणि 55 बिबटय़ांची शिकार झाल्याचे नुकतेच उघडकीस आले होते.
देशातील व्याघ्र मृत्यूचा चढता आलेख
वर्ष मृत्यू
2020 106
2021 127
2022 121
2023 178
2024 124
2025
(जानेवारी ते एप्रिल) – 62
वाढत्या मृत्यूमागे संघटित टोळी
2022मध्ये देशात 3 हजार 167 वाघांची नोंद झाली. त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा होता. राज्यात 2018मध्ये 312 वाघांची नोंद झाली होती. पुढच्या चार वर्षांत त्यात मोठी वाढ झाली होती आणि ती संख्या 444वर पोहचली होती. व्याघ्र संवर्धनामध्ये आघाडीवर राहिलेल्या महाराष्ट्रात अलीकडे व्याघ्रमृत्यूची संख्या वाढली आहे. वाघांच्या वाढत्या मृत्यूमागे संघटित गुन्हेगारी टोळी कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.