
फोर्टच्या बॅलार्ड इस्टेटमधील ईडी कार्यालय असलेल्या पैसर-ए-हिंद इमारतीला आज भल्या पहाटे अडीचच्या सुमाराला भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीचा मोठा भडका उडाला. तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीत फर्निचर, रबरी वस्तूंबरोबर महत्त्वाची कागदपत्रे, फायली, संगणक, लॅपटॉप जळून खाक झाले. सुदैवाने या आगीत कोणालाही इजा झाली नाही. दरम्यान, आगीचे कारण अजूनही गुलदस्त्यात असून ईडीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले. मात्र त्यांनी माध्यमांशी संवाद टाळला
फोर्ट येथील कैसर-ए-हिंद या पाच मजली इमारतीत सक्तवसुली संचालनालयातचे (ईडी) कार्यालय आहे. शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमाराला चौथ्या मजल्यावर आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र इमारतीच्या खिडक्या, दरवाजे बंद असल्यामुळे आगीने भीषण रूप धारण केले. त्यामुळे अग्निशमन दलाने पहाटे साडेतीन वाजता लेव्हल दोनची आग जाहीर केली, तर सव्वाचार वाजता लेव्हल तीनची आग जाहीर केली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांनी काचेच्या खिडक्या पह्डल्या. त्यामुळे आग आणि धुराची तीव्रता कमी झाली.
आगीची चौकशी होणार
मध्यरात्री बंद इमारतीत आग लागल्यामुळे चौथ्या मजल्यासह इतर ठिकाणी मोठय़ा प्रमाणात धूर आणि उष्णता निर्माण झाली होती. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवताना अडचणी आल्या. मात्र जवानांनी अथक प्रयत्न करून शेवटी ही आग नियंत्रणात आणली. दरम्यान, या आगीच्या कारणांची चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली.
– ईडीचे अतिरिक्त संचालक अमित दुवा हे सकाळी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी आगीत काही कागदपत्रे, फायली, संगणक हे संपूर्ण जळून खाक झाल्याचे आढळले. जळालेल्या फायली, कागदपत्रे नेमकी कोणत्या केसशी संबंधित होती, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
– अग्निशमन दलाची 8 अग्निशमन इंजिन, 6 जंबो टँकर, 1 एरियल वॉटर टॉवर टेंडर, 1 ब्रिदिंग अॅपरेटस व्हॅन, 1 वॉटर क्विक रिस्पॉन्स वाहन आणि 108 रुग्णवाहिका असा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. मात्र व्हरांडय़ात मोठय़ा प्रमाणात फर्निचर रचून ठेवल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात मोठय़ा प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता.