
कृणाल पंडय़ाने नऊ वर्षांनंतर झळकावले अर्धशतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी हॅटट्रिकच्या जोरावर बंगळुरूने दिल्लीचा 6 विकेटनी पराभव करत आपल्या सातव्या विजयाची नोंद केली आणि गुणतालिकेत 14 गुणांसह अव्वल स्थान काबीज केले असून प्ले ऑफमध्ये धडक मारण्यासाठी त्यांना चारपैकी केवळ एक सामना जिंकावा लागणार आहे.
स्पर्धेच्या प्रारंभीच सलग चार सामने जिंकून अव्वल स्थानावर पोहोचलेल्या दिल्लीला आज बंगळुरूकडून हार सहन करावी लागली. दिल्लीला आज फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांच्या धडाकेबाज फलंदाजांनाही षटकारबाजी करण्यात यश न लाभल्यामुळे त्यांना 8 बाद 162पर्यंत पोहोचता आले तर 163 धावांचा पाठलाग करणाऱया बंगळुरूची अक्षर पटेलने तीन चेंडूंत 2 विकेट घेत 2 बाद 20 अशी अवस्था केली. मग कर्णधार रजत पाटीदार धावबाद झाल्याने बंगळुरू 3 बाद 26 अशा स्थितीत पोहोचला. इथे दिल्लीने सामन्यावर पकड घेतली होती, पण पृणाल पंडय़ाने विराट कोहलीच्या साथीने दिल्लीच्या गोलंदाजीला पह्डून काढीत सामनाही खेचून आपल्याकडे आणला. पंडय़ाने 47 चेंडूंत 4 षटकार आणि 5 चौकार ठोकत नाबाद 73 धावा केल्या आणि संघाला सातवा विजय मिळवून दिला. हे त्याचे 9 वर्षांनंतर पहिले अर्धशतक ठरले. कोहलीनेही आपले अर्धशतकी सातत्य कायम ठेवताना 73, 70नंतर 51 धावांची तिसरी अर्धशतकी खेळी साकारली.