
तिरंगी मालिकेच्या सलामीच्या लढतीत हिंदुस्थानी फिरकी गोलंदाज स्नेह राणा, दीप्ती शर्मा आणि श्री चरणी यांच्या अचूक माऱयाने यजमान श्रीलंकेचा डाव 38.1 षटकांतच गुंडाळला आणि 148 धावांचे लक्ष्य 29.4 षटकांतच गाठत 122 चेंडू आणि 9 विकेट राखून दणदणीत आणि खणखणीत सलामी दिली. सामन्यात पहिल्या डावात फिरकीची जादू चालली असली तरी 50 धावांची अभेद्य खेळी करत दोन अर्धशतकी भागीदाऱया रचणारी प्रतिका रावल हिंदुस्थानच्या विजयाची पुरस्कारविजेती शिल्पकार ठरली.
हिंदुस्थानची अर्धी लढाई फिरकीतारकांनीच जिंपून दिली होती तर त्यावर प्रतिका रावल (ना. 50), स्मृती मानधना (43) आणि हरलीन देओल (ना. 48) यांनी कळस चढवला. हिंदुस्थानच्या फलंदाजांना विजयासाठी फार संघर्ष करावा लागला नाही. स्मृतीने 54 धावांची सलामी देताना त्यात 43 धावा स्वतःच ठोकल्या. तिने 46 चेंडूंच्या या खेळीत 6 चौकार खेचले. त्यानंतर प्रतिका आणि हरलीने लंकन गोलंदाजांना आरामात खेळत 30व्या षटकात संघाच्या सलामीच्या विजयावर आपले नाव कोरले. दोघांनी 95 धावांची अभेद्य भागी रचली.
हिंदुस्थानच्या हरमनप्रीतने टॉस जिंकला आणि हातात चेंडू घेतला. तिचा निर्णय चुकीचा तर नाही ना असे वाटत असताना अरुंधती रेड्डीच्या गोलंदाजीवर चामरी अटापट्टू बाद झाली. त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजीला हिंदुस्थानी फिरकी गोलंदाजांनी अक्षरशः नाचवले. स्नेह राणाच्या प्रभावी फिरकीने सलामीच्या हसिनी परेराला पायचीत केले आणि श्रीलंकेच्या डावाला घसरगुंडी लागली. राणाने हंसिमा करुणारत्ने (4) आणि निलाशिका सिल्वा (10) या दोघींचा अडसर दूर करत लंकेची 5 बाद 93 अशी अवस्था केली. मग श्री चरणीने श्रीलंकन फलंदाजीला सलग षटकांत दोन हादरे देत यजमानांना 7 बाद 112 अशा स्थितीत नेले. मात्र त्यानंतर अनुष्का संजीवनी (22) आणि अचिनी पुलसरिया (17) या दोघींनी 32 धावांची भागी रचत संघाला 142पर्यंत पोहोचवले. तेव्हा दीप्ती शर्माने आपल्या फिरकीची कमाल दाखवत 3 चेंडूंत या दोघींना परतीचा मार्ग दाखवत लंकेचा दीडशेचा टप्पासुद्धा गाठू दिला नाही. 38.1 षटकांतच यजमानांचा डाव 147वर संपवत हिंदुस्थानच्या सलामीच्या विजयाचा पाया रचला. तिघा फिरकीतारकांनी 79 धावांत 7 विकेट टिपल्या.