दिल्ली डायरी – अण्णा द्रमुकने तोंडावर पाडले, पुढे काय?

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

भाजपने अण्णा द्रमुकपुढे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा हात केला होता. ‘अन्ना हाथ बढाना’ म्हणत अमित शहा चेन्नईला जाऊन आले. मात्र दिल्लीत परत येत नाहीत तोवरच अण्णा द्रमुकने ‘भाजपशी आमचा फक्त निवडणुकीपुरता समझोता झालेला आहे, युती नाही. तामीळनाडूतले पुढचे सरकार फक्त एकटd अण्णा द्रमुकचेच असेल,’ अशी घोषणा करून भाजपला तोंडावर आपटले आहे. म्हणजे अण्णा द्रमुक – भाजपचा साखरपुडा झालाय खरा. मात्र अण्णा द्रमुकला लग्न नकोय.

अण्णा द्रमुकला भाजपचा पूर्वीचा अनुभव फारसा काही चांगला नाही. त्यातच हिंदीची सक्ती व परिसीमन या मुद्दय़ांवरून तामीळ अस्तिमेला हुंकार मिळाला आहे. स्टॅलिन या अस्मितेच्या लाटेवर बाजी मारतील अशी स्थिती आहे. राज्यपालांना न जुमानता स्टॅलिन यांनी नुकतेच काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे एका वर्गात ते ‘हिरो’ बनत आहेत. अशा स्थितीत जयललिता हयात नसताना भाजपचे लोढणे गळ्यात बांधून घ्यायला अण्णामलाई तयार नाहीत. भाजपसोबत युती म्हणजे लुंगीत पाय अडकून तोंडावर पडण्यासारखे आहे. त्यामुळे अमित शहा दिल्लीत पोहोचत नाहीत तोवर अण्णामलाई व तंबीदुराई यांनी एका सुरात सूर मिसळून आमचा समझोता आहे. सरकारमध्ये भागीदारी असणार नाही, असे भाजपला ठणकावून सांगितले आहे. किमान एवढे तरी सांगण्याचे धैर्य त्यांनी ईडी, सीबीआयला न घाबरता केले, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावेच लागेल!

फुकटची हिरोगिरी करणारे अन्नामलाई यांना अगोदर पदावरून हटवा तेव्हाच युतीविषयी बोलणी करू, असा कडक निरोप अण्णा द्रमुकने पाठविल्यानंतर अमित शहा तातडीने चेन्नईला पोहोचले. तामीळनाडूतील लोकसभा खासदारांची मोठी संख्या हे त्यामागचे कारण. अण्णा द्रमुकचा टोकाचा विरोध लक्षात घेऊन भाजपने अन्नामलाईंना नारळ दिला आणि नागेंद्रन यांची त्यांच्या जागी नियुक्ती केली. युतीच्या आणाभाका घेतल्या गेल्या. जयललितांबद्दलचे पुतनामावशीचे प्रेम अमित शहा यांनी व्यक्त केले. या युतीने तामीळनाडूच्या राजकारणात फारसा बदल घडणारा नव्हता. मात्र भाजपला बुडत्याला काडीचा आधार मिळणार होता. भाजपने तामीळनाडूत गेली अनेक वर्षे पक्षाचा विस्तार करण्यासाठी नको नको ते प्रयोग करून पाहिले. मात्र एकही यशस्वी झाला नाही. मुळात तामीळनाडूचे राजकारण व समाजकारण हे द्रविडी चळवळींशी निगडित आहे. त्यात भाजपच्या विचारधारेला तामीळनाडूत स्थान नाही. त्या राज्यात काँगेस कधी स्थिरावू शकली नाही, तर भाजप स्थिरावणे जवळपास दुरापास्त आहे. अशा राजकीय वाळवंटात कमळ खुलविण्याच्या बाता भाजपच्या अंधभक्तांनी केल्या. त्यांच्या डोळ्यांत अण्णा द्रमुकचे नेते तंबीदुराई यांनी छानपैकी अंजन घातले आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून तामीळनाडूचा आपला इतिहास आहे. इथे आघाडय़ांचे सरकार चालत नाही. राजगोपालचारींपासून ते अण्णा दुराई, रामचंद्रन, करुणानिधी, जयललितांच्या सरकारांपर्यंत सर्व एकमुखी व एकचालकानुवर्ती राहिले आहे. त्यामुळे तामीळनाडूत आम्ही भाजपसोबत समझोता केला असला तरी भविष्यात आमचे एकटय़ाचेच सरकार सत्तेवर असेल, असे ठामपणे सांगत तंबी दुराईंनी भाजपला झटका दिला आहे.

टाईम ‘आऊट’

जाहिरातबाजी व नरेटिव्ह रचून काही काळ लोकांना भ्रमित करता येते. मात्र सदासर्वकाळ हे करणे कपाळमोक्ष करवून घेण्यासारखे आहे. सध्या भाजपवाले सगळीकडे एक प्रचाराचे तुणतुणे वाजवत असतात ते म्हणजे, ‘दुनिया में भारत का डंका बज रहा है.’ मात्र हा डंका कुठे वाजतो? हे भक्तगणच जाणो. विश्वविख्यात ‘टाईम मॅगझिन’च्या शक्तिशाली शंभर लोकांतही आपले विश्वगुरू नाहीयेत. ‘टाईम मॅगझिन’मधून आऊट होणारे हे विश्वगुरूंचे हे पहिले वर्ष नाही, तर 2021 पासून नरेंद्र मोदींना ‘टाईम मॅगझिन’मध्ये स्थान मिळालेले नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या, मोठय़ा लोकसंख्येच्या देशाच्या प्रमुखाला या यादीत स्थान नाही हे देशासाठी दुर्दैवी आहे. गेला बाजार मोहम्मद युनूस याच्यासारख्या भंपक माणसाला या शक्तिशाली नेत्यांमध्ये स्थान आहे, पण मोदींना नाही हे अधिक वेदनादायी आहे. गेल्या चार-पाच वर्षांत हिंदुस्थानबद्दल जगभरात पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होत आहे. पासपोर्ट रँकिंगच्या बाबतीतही देशाची घसरण होत आहे. दररोज नव्या मुद्दय़ावर सरकारी प्रवक्त्यांना सफाई द्यावी लागत आहे. मोदी हे रशिया-युव्रेनमधले युद्ध एका मिनिटात चुटकीसरशी मिटवू शकतील, अशा गावगप्पांमध्ये रमलेल्या भक्तमंडळींनी ‘टाईम मॅगझिन’ वाचावे इतकेच!

आयपीएस अधिकाऱ्यांचे ‘राजकीय प्रेम’

सरकारी सेवेत त्या-त्या वेळच्या बॉसेसची खुशामतगिरी करायची आणि ‘मलाईदार पोस्टिंग’ मिळवून माया मिळविल्यानंतर राजकारणात उडी मारायची, असा एक भयंकर ट्रेंड सध्या प्रशासकीय सेवेत आला आहे. एकेकाळी देशातील प्रशासकीय व पोलीस सेवा ही अतिशय प्रतिष्ठsची मानली जायची. देशाच्या विकासात व कायदा-सुव्यवस्था राखण्याचे अनेक मानदंड या सेवेतील अधिकाऱ्यांनी रचले. त्यामुळे काही चांगल्या अधिकाऱ्यांबद्दल आजही आदराने बोलले जाते. मात्र नव्या पिढीतील अधिकारी हे सिंघम टाईप आहेत. पैसे देऊन आपले महिमामंडन करायचे. त्यासाठी सोशल मीडियावर भक्तमंडळे नेमायची आणि स्वतःचा, कुटंबाचा उदोउदो करून घ्यायचा अशी घाणेरडी प्रथा पडली आहे. बिहारमध्ये गेल्या काही वर्षांत ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे, त्यांच्यावर त्यामुळेच संशयाच्या सुया रोखल्या गेल्या आहेत. नव्या पिढीतील अधिकाऱ्यांना प्रशासकीय सेवेत चांगली कामगिरी करून दाखविण्यापेक्षा राजकारणात जाऊन अश्विनी वैष्णव, जयशंकर यांच्यासारखी पदे मिळवावीशी वाटतात, त्यात वावगे काही नाही. मात्र त्यासाठी तेवढे कर्तृत्व तरी असावे. बिहारमध्ये आनंद मिश्रा, वैभव विकास व शिवदीप लांडे या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी नोकऱ्या सोडून राजकारणात उडय़ा मारल्या आहेत. बी. के. सिंग हे आधीच राजकारणात डेरेदाखल झाले आहेत. यापैकी बहुतांश जण हे प्रशांत किशोर यांच्या पक्षात सामील झाले आहेत, तर काहींनी वेगळा पक्ष काढला आहे. एखादा नवा पक्ष काढण्याएवढा पैसा अधिकाऱ्याकडे कुठून आला? याचा शोध ईडी घेणार नाही. याचे कारण म्हणजे भाजपचा राजकीय फायदा करण्यासाठीच असे छोटे-मोठे पक्ष तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय सेवेत गोळा केलेला काळा पैसाही सरकारी कृपेने ‘गोरा’ होणार आहे.