आव्हानांवर मात करत 14.57 किमी बोगद्याची निर्मिती, हिंदुस्थानातील सर्वात लांब रेल्वे बोगदा उत्तराखंडमध्ये

उत्तराखंडमधील देवप्रयाग आणि जनसूदरम्यान हिंदुस्थानातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आला आहे. बोगद्याचे काम पूर्ण करताना अनेक आव्हाने समोर आली. विविध आव्हानांवर मात करत तब्बल 14.57 किमी रेल्वे बोगद्याची निर्मिती करण्यात आली. ‘शक्ती’ नावाची टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) बोगद्याच्या आत सुमारे पाच किमी अंतरावर होती. यावेळी हे मशीन चारही दिशांनी प्रति मिनिट सुमारे 1,500 लिटर या वेगाने येणाऱ्या पाण्याचा सामना करत होते, असे बोगद्याचे प्रकल्प संचालक राकेश अरोरा यांनी सांगितले.

टीबीएम ऑपरेटरव्यतिरिक्त त्यावेळी बोगद्यात 200 लोक काम करत होते. पूर येण्याचा किंवा काही भाग कोसळण्याचा धोका होता. सततच्या पाण्याच्या प्रवाहामुळे मजुरांचे मोठे हाल झाले, पण सुदैवाने ताबडतोब सुधारणात्मक उपाययोजना करण्यात यश आले. जवळपास एक महिना पाण्याचा प्रवाह कायम होता. बोगद्यात चिखलाचे साम्राज्य तयार झाले होते. विविध उपाययोजनांनंतर पाण्याचा प्रवाह कमी होऊ लागला, अशी माहिती अरोरा यांनी दिली.

सर्वात जलद पूर्ण झालेला बोगदा

125 किमी लांबीच्या हृषीकेश-कर्णप्रयाग रेल्वे लिंक प्रकल्पातील 14.57 किमी लांबीच्या बोगद्याचे काम 16 एप्रिल रोजी पूर्ण झाले. राकेश अरोरा यांच्या माहितीनुसार, स्पेनमधील 9.69 मीटर व्यासाचा कॅब्रेरा बोगदा डबल शील्ड टीबीएमद्वारे सरासरी 423 मीटर दरमहा बांधण्यात आला, तर 10.49 किमी लांबीचा देवप्रयाग-जनसू बोगदा सिंगल शील्ड टीबीएमच्या माध्यमातून सरासरी 413 मीटर दरमहा अर्थात एका महिन्यात पूर्ण करण्यात आला.

पाण्याचा प्रवाह टीबीएमचा मोठा शत्रू

राकेश अरोरा पुढे म्हणाले की, हिमालयात कोणताही प्रकल्प उभारणे आव्हानात्मक असते. तेथील वातावरणामुळे संपूर्ण प्रकल्प अत्यंत आव्हानात्मक आणि मनोरंजक बनतो. एकूण 125 किमीपैकी 105 किमी बोगद्यांमधून जात असतो. पाण्याचा प्रवाह हा टीबीएमचा मोठा शत्रू असून त्यामुळे कामात अडथळा येतो. शिवाय संपूर्ण कामकाज ठप्प होते. एकदा टीबीएम बोगद्यात अडकला की, प्रकल्प सोडून दिला जातो.