
जुन्या वादातून 21 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची घटना अहमदपूर तालुक्यात घडली. याप्रकरणी अहमदपूर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बळीराम दत्तात्रय सुर्यवंशी असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
26 एप्रिल रोजी सकाळी फिर्यादी छाया सुर्यवंशी या उमरगा येथे कापूस वेचण्यासाठी मुजुरीला गेल्या होत्या. तर त्यांचे पती दत्तात्रय लक्ष्मण सुर्यवंशी हे लातूर येथे औषधं आणण्यासाठी गेले होते. लहान मुलगा बळीराम सुर्यवंशी हा दु 1.30 वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त गौस समद शेख याच्या घरी गेला होता. यावेळी त्यांच्यामध्ये जुना वाद उफाळून आला.
हा वाद विकोपाला गेला. यानंतर गौस समद शेख आणि गफुर गौस शेख यांनी बळीरामला काठीने मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. मारहाण केल्यानंतर बळीरामला त्याच्या घरासमोर फेकून दिले. जखमी बळीरामला लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी बळीरामची आई छाया सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गौस समद शेख आणि गफुर गौस शेख यांच्याविरोधात अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.