कुपवाडामध्ये दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार; सामाजिक कार्यकर्ते गुलाम रसूल मगरे यांचा मृत्यू, जम्मू-कश्मीरमध्ये हाय अलर्ट

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू-कश्मीरमध्ये काटेकोर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर एकीकडे सीमारेषेवर पाकड्यांच्या कुरापती सुरू गेल्या तीन दिवसांपासून गोळीबार सुरू आहे. तर दुसरीकडे जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याचे समोर आले आहे.

कुपवाडा जिल्ह्यातील कंडीखास भागामध्ये शनिवारी अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला. गुलाम रसूल मगरे (वय – 45) असे मृताचे नाव असून ते सामाजिक कार्यकर्ते होते. गोळीबारानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या हल्ल्यानंतर कुपवाडामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांकडून संशयित दहशतवाद्याचा शोध सुरू असून हाल अलर्ट जारी करण्यात आला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिले आहे.

जम्मू कश्मीरमध्ये आणखी तीन दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त, सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशीरा दहशतवाद्यांनी सामाजिक कार्यकर्ते गुलाम रसूल मगरे यांच्यावर कंडीखास भागातील घरात घुसून गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.