राष्ट्रवादीचा गटनेता बदलण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली, आमदार रोहित पवार यांना दुसरा धक्का; कर्जत नगरपंचायतची सत्ता जाणार

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांनी अविश्वास ठरावावर मतदान होण्यापूर्वीच पदाचा राजीनामा दिल्याने आमदार रोहित पवारांना बसलेल्या पहिल्या धक्क्यापाठोपाठ आता दुसरा धक्का बसला आहे. कर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा गटनेता बदलण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे.

कर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांसह काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर अविश्वास दाखल केला होता. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे त्यांना पाठबळ होते. मात्र, या अविश्वास ठरावावर मतदान व निर्णय करण्यासाठी आयोजित सभेपूर्वीच नगराध्यक्ष राऊत यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ती प्रक्रिया झाली नाही. आता नव्याने उद्या (28 रोजी) नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे. या पाश्र्वभूमीवर आमदार रोहित पवार गटाच्या कर्जत नगरपंचायतीतील सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता बदलण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती व त्यामध्ये अमृत काळदाते यांना गटनेता म्हणून नोंदविण्यातबाबत मागणी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर गटनेता बदलाबाबत रोहित पवार गटाची असणारी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावून राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे कर्जत नगरपंचायत गटनेता म्हणून संतोष मेहत्रे व उपनेते म्हणून सतीश पाटील यांची असणारी नेमणूक कायम ठेवली आहे.

जिल्हाधिकारी यांच्या या आदेशामुळे रोहित पवार गटाची कर्जत नगरपंचायतीमधून सत्ता जाणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. आमदार रोहित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. या आदेशामुळे संतोष मेहत्रे यांना गटनेता म्हणून रोहित पावर गटाच्या कर्जत नगरपंचायतीतील सर्व सदस्यांना ‘व्हिप’ बजावता येणार आहे. जे नगरसेवक कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये व्हिपविरोधात मतदान करतील, त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे.

रोहित पवार यांच्या गटाने अमृत काळदाते यांची गटनेतेपदी व प्रतिभा भैलुमे यांची उपगटनेतेपदी निवडीसाठी अर्ज केला होता. 26 मार्च रोजी झालेल्या रोहित पवार गटाच्या नगरसेवकांच्या सभेत हा निर्णय झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र, यास रोहिणी घुले व अन्य 10 नगरसेवकांनी आक्षेप घेतला. 26 मार्चला गटाची कोणतीही सभा झाली नाही व गटनेते बदलाचा कोणताही निर्णय झाला नसल्याचा दावा त्यांनी केला होता. यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे 25 एप्रिलला सुनावणी झाली. त्यावेळी 11 नगरसेवकांनी 26 मार्चची सभा झाली नसल्याचे स्पष्ट केले, तर गट नोंदणी करतेवेळी अंगठा उमटविणाऱ्या नगरसेविकेने ‘आता आपण अंगठा वापरत नाही, तर सही करते,’ असे स्पष्ट करून गटनेता बदलाची बैठक झाली नसल्याचे स्पष्ट केले. रोहित पवार गटाच्या 15 नगरसेवकांपैकी 11 जणांनी 26 मार्चची सभा झाली नसल्याचे स्पष्ट केल्याने, तसेच गटनेता बदलासाठी अर्ज करणारे अमृत काळदाते हे 26 मार्चची सभा झाल्याचे सिद्ध करू शकले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गटनेता बदलाचा अर्ज निकाली काढला.

दरम्यान, या घडामोडींमुळे आता कर्जत नगरपंचायतीमध्ये विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या गटाचा नगराध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.