पहलगाम हल्ल्याचे तीव्र पडसाद सुरुच ! करवीर शिवसेनेकडून निषेध; पाकचा ध्वज जाळला

पहलगाम येथे पर्यटकांची हत्या करणारे दहशतवादी आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध देशभरात अजूनही संतापाची लाट उसळलेली आहे. जनतेकडून सूड घेण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पुणे-बंगळुरू महामार्गावरील कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या तावडे हॉटेल चौकात पाकिस्तानी ध्वजासह अतिरेक्यांची प्रतिमा असलेले पोस्टर जाळून तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी ‘जलादो, जलादो, पाकिस्तान जलादो’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. तत्पूर्वी हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, ‘पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे आपल्या देशाची सीमा सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हे केंद्रीय गृहखाते व गुप्तचर यंत्रणेचे मोठे अपयश असून, याची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी केली. या वेळी सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाथर्डीत मुस्लीम बांधवांकडून अतिरेक्यांच्या पुतळ्याचे दहन
अतिरेक्यांच्या प्रतीकात्मक पुतळा जाळून व पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत आज पहलगाम हल्ल्याचा मुस्लीम व हिंदू बांधवांकडून निषेध करण्यात आला. नाईक चौकात आज या घटनेच्या निषेधार्थ मुस्लीम | बांधवांनी निषेध केला. या आंदोलनात काँग्रेस तालुकाध्यक्ष नासिर शेख, चांद मणियार, शन्नो पठाण, डॉ. रामदास बर्डे, किसन आव्हाड, संदीप काटे, बबलू वावरे, युसूफ शेख, देवा पवार, लालभाई शेख, जहीर शेख, उबेद आतार, जुनेद पठाण, अक्रम आतार, अलीम बागवान, वसीम पिंजारी, फिरोज मणियार, अरबाज पठाण, सादिक मणियार, अल्ताफ शेख, तैयब पिंजारी, ख्वाजा पिंजारी सहभागी झाले होते.

14 पाकड्यांना शिवसैनिकांच्या ताब्यात द्या – किरण काळे

अहिल्यानगर शहरात 14 पाकिस्तानी वास्तव्यास आहेत. ते बेकायदेशीररीत्या शहरात वास्तव्य करीत आहेत. त्या 14 पाकड्यांना शिवसैनिकांच्या ताब्यात द्या, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख किरण काळे यांनी सोशल मीडियातून जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. ‘आम्ही पाहून घेऊ, त्या पाकड्यांचं काय करायचं ते’, असा इशारा त्यांनी दिला आहे. तशी पोस्ट काळे यांच्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. निष्पाप 28 हिंदूंची हत्या केल्यानंतरही राज्य सरकार त्यांना बिर्याणी खाऊ घालतंय काय?, असा संतप्त सवालही काळे यांनी केला आहे.
काळे यांनी म्हटले आहे की, अहिल्यानगर शहरात पाकड्यांच्या 14 औलादी आहेत. पण, सबंध महाराष्ट्रात 48 शहरांतील त्यांची संख्या 5023 एवढी आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात 2458 पाकडे आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात 1106 आहेत. गंभीर बाब म्हणजे यापैकी केवळ 51 जणांकडेच वैध दस्तावेज आहेत. 107 बेपत्ता आहेत. ते कोणत्या बिळात लपले आहेत हे माहीत नाही. हे मी नाही तर राज्याचे गृहराज्यमंत्री सांगत आहेत. यावर काळे यांनी शिवसेनेच्या वतीने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

कोल्हार गाव बंद; नागरिकांकडून संताप
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर नव्हे; तर हिंदुत्वावर आणि देशावर केलेला हा हल्ला आहे. धर्म विचारून हल्ला केल्याने पाकिस्तानला हिंदुस्थानात हिंदू-मुस्लीम वाद वाढवायचा आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवाद्यांना व पाकिस्तानला केंद्र सरकारने चोख प्रत्युत्तर देऊन त्यांचे अस्तित्व संपवून टाकावे, अशा संतप्त भावना कोल्हार येथील निषेध आणि श्रद्धांजली सभेत व्यक्त झाल्या.

पहलगामच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थ व व्यापारी यांच्या वतीने सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. या वेळी | बंद ठेवण्यात आले होते. गाव निषेध सभेला अ‍ॅड. सुद्ध खर्डे, बी. के. खर्डे,इलियास शेख, ज्ञानेश्वर खर्डे, संभाजीराजे देवकर, संजय शिंगवी, बब्बा शेख, स्वप्नील निबे, सुरेश पानसरे, जावेद शेख, श्रीकांत बेंद्रे, बाबू लोखंडे, अरुण बोरुडे, असिर पठाण, डॉ. शशिकांत काळे, शिवकुमार जंगम, साहेबराव दळे, वसंत मोरे, अनिल बांगरे, शोभा लोखंडे, ऋषिकेश खांदे, प्रकाश खर्डे, दत्तात्रय राजभोज, धनंजय दळे, नानासाहेब कडसकर, साईनाथ खर्डे आदी उपस्थित होते. या वेळी लोणी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.