IPL 2025 – मुंबई-लखनौ यांच्यात आज रस्सीखेच

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांनी यंदाच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 9 पैकी 5-5 लढती जिंकल्या आहेत. दोघांचेही 10-10 गुण जमा असून, नेट रनरेटमध्ये मुंबई सरस आहे. मात्र, गुणतक्त्यात एकमेकांना खाली खेचण्यासाठी उभय संघ मैदानावर विजयासाठी जीवाचे रान करताना दिसतील.

मुंबईने लागोपाठ चार विजय मिळविले असले, तरी लखनौविरुद्धची त्यांची आकडेवारी चिंताजनक आहे. पाच वेळच्या चॅम्पियन असलेल्या मुंबईला लखनौने सातपैकी सहा लढतींमध्ये हरविले आहे. मात्र, त्यावेळी लोकेश राहुल लखनौचा कर्णधार होता. यावेळी राहुल नसला, तरी निकोलस पूरन, मिचेल मार्श, एडेन मार्करम व डेविड मिलर हे फलंदाज लखनौसाठी सातत्याने धावा करत आहेत. याचबरोबर, आवेश खान, रवि बिश्नोई व शार्दूल ठाकुर या गोलंदाजांनीही आतापर्यंत प्रभावी मारा केलेला आहे. त्यामुळे मुंबईसाठी उद्याची लढाई तशी सोपी नसेल.

दुसरीकडे रोहित शर्मा फॉर्मात परतल्याने मुंबईची ताकद वाढलेली आहे. शिवाय, सूर्यकुमार यादवचीही बॅट तळपायला लागली आहे. कर्णधार हार्दिक पंड्या गोलंदाजी अन् फलंदाजीतही योगदान देत आहे. शिवाय, जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट हे जगातील दोन खतरनाक गोलंदाज दिमतीला असल्याने या घडीला तरी मुंबईचे पारडे नक्कीच सरस वाटत आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी ही लढत एक पर्वणीच ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)