
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अंबाला येथे पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात जेवण केलेल्या 500 ते 600 जणांना विषबाधा झाली आहे. एकाचवेळी एवढ्या नागरिकांना मळमळ, उलट्या, जुलाबाचा त्रास झाल्याने खळबळ उडाली. यामध्ये एका 8 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. सुरेश गुलाब मधे (वय – 8, रा. महादेवखोरा, ता. कन्नड) असे मुलाचे नाव आहे. तर संगीता मेंगाळ (वय – 25) या महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाला येथे शुक्रवार (25 एप्रिल) रोजी ठाकर समाजाच्या आठ जोडप्यांचा सामूहिक विवाह पार पडला. दुपारी साडे चारच्या सुमारास हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर पाचच्या सुमारास जेवणाच्या पंगती सुरू झाल्या. सामूहिक विवाह सोहळ्याला शेकडो लोक जेवण करून गेले.
शनिवारी दुपारच्या सुमारास लग्नात जेवलेल्यांना मळमळ, उलट्या, जुलाब अशी लक्षणे दिसू लागली. स्थानिक रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अनेकांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान, 8 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याचे कळताच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह इतर वैद्यकीय पथकांनी रुग्णालयास भेट दिसून परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुढील सूचना केल्या. विषबाधा नेमकी झाली कशी आणि दोषी कोण याचा तपास सध्या सुरू आहे.