
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या गुजरातमध्ये हजारो बांगलादेशी घुसखोर वास्तव करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गुजरातमधील अहमदाबाद आणि सुरतमधील कोम्बिंग ऑपरेशननंतर महिला आणि मुलांसह 1,000 हून अधिक बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या हद्दपारीचे प्रयत्न सुरू असल्याचे गृह राज्यमंत्री हर्ष सांघवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. अहमदाबादमध्ये 890 आणि सुरतमधून 134 बांगलादेशींना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे.
राज्यातील बेकायदेशीर स्थलांतरितांना सांघवी यांनी स्वतःच्या इच्छेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. अन्यथा त्यांना पकडले जाईल आणि हद्दपार केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अवैध स्थलांतरितांना आश्रय देणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, अटकेत असलेल्यांनी गुजरातमध्ये येण्यापूर्वी देशाच्या विविध भागांत राहण्यासाठी पश्चिम बंगालमधून मिळवलेल्या बनावट कागदपत्रांचा वापर केला. यापैकी चार जण मानवी तस्करी करत असत. त्यांना बनावट कागदपत्रे कशी मिळाली याचीही चौकशी केली जाईल.
अटकेत असलेल्यांनी राज्यात बनावट कागदपत्रे कशी बनवली याचा पुरावा पश्चिम बंगाल सरकारला दिला जाईल. पोलिसांना संपूर्ण गुजरातमध्ये अवैध स्थलांतरितांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना गुजरात सोडण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
सुरक्षा दलांच्या कारवायांचे थेट प्रक्षेपण करू नये, केंद्र सरकारच्या सूचना
लष्कराच्या कारवाया आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण करू नये, अशा सूचना आज सरकारने प्रसारमाध्यमांना दिल्या. अशा प्रकारचे वृत्तांकन अनवधानाने शत्रूंना मदत करू शकते, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे. जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ही सूचना जारी करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा सरकारने दिला आहे.