
कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांच्या कुटुंबीयांची शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे यांनी आज भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ही कधीही न भरून येणारी हानी आहे. याप्रसंगात शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी आहे असे वचन विचारे यांनी या कुटुंबीयांना दिले. तिघांच्याही वारसांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळवून देण्यासाठी शिवसेना मदत करेल असे सांगतानाच सरकारने या दहशतवादी हल्ल्यातील बळींना शहिदांचा दर्जा द्यावा तसेच तिन्ही कुटुंबांची संपूर्ण जबाबदारी घ्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांची राजन विचारे यांनी भेट घेऊन धीर दिला. याप्रसंगी शिवसेना उपनेते विजय साळवी, कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, जिल्हा संघटक तात्या माने, विभागप्रमुख प्रमोद कांबळे, कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, मा. स्थायी समिती सभापती विलास म्हात्रे, डोंबिवली पश्चिम शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, उपशहर प्रमुख सुरज पवार, विभाग प्रमुख प्रमोद कांबळे, प्रदीप सावंत, शाम चौगुले, नितीन पवार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने पॅरालिसिस असलेल्या आईसह संपूर्ण कुटुंबाला वाचवण्यासाठी दाखवलेल्या धैर्याचे विचारे यांनी विशेष कौतुक केले. हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत देण्यात आली आहे. मात्र हा धक्का मोठा असल्याने ती 50 लाखांपर्यंत वाढवावी, त्यांच्या वारसांना रेल्वेमध्ये नोकरी मिळावी आदी मागण्या यावेळी राजन विचारे यांनी केल्या.