
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उभारण्यात येणाऱ्या नागरिक सुविधा केंद्र आणि अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन उद्या, सोमवारी दुपारी 12 वाजता म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते होणार आहे. या कक्षामुळे विविध कामानिमित्त म्हाडा मुख्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे हेलपाटे थांबणार आहेत.
म्हाडा मुख्यालयात विविध कामानिमित्त दिवसाला सुमारे चार ते पाच हजार नागरिक येतात. एखाद्या विभागाशी संबंधित आपली तक्रार असल्यास तो विभाग शोधण्यापासून ते तक्रार दाखल केल्यानंतर त्या तक्रारीचा फॉलोअप घेण्यासाठी नागरिकांना वारंवार म्हाडा मुख्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. तीन हजार चौरस मीटर जागेवर हे केंद्र उभारण्यात आले असून 18 काऊंटर यात आहेत. नागरिकांचे तक्रार अर्ज, टपाल या केंद्रावर स्वीकारले जाणार आहेत. त्या अर्जाचा फॉलोअपदेखील नागरिकांना याच केंद्रावर घेता येणार आहे.