काळजी घ्या… वाढत्या उष्णतेमुळे नेत्रसंसर्ग, अतिसार आणि त्वचाविकार

सूर्य अक्षरशः आग ओकू लागल्यामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहेत. यामध्ये नेत्रसंसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाढलेल्या तापमानामुळे डोळ्यातील बुब्बुळे कोरडी होऊन संसर्ग होत असल्याने डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन नेत्रविकार तज्ञांकडून करण्यात आले आहे.

विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी दैनंदिन तापमान 40 अंश सेल्सिअसवर गेले आहे. मुंबईतही वाढते तापमान आणि प्रदूषण यामुळे डोळ्यांवर परिणाम होत आहे. सतत उन्हामध्ये फिरल्यामुळे डोळे चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे अशी किरकोळ लक्षणे दिसतात, मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास डोळ्यातील बुब्बुळे कोरडी होऊन डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी उन्हात फिरताना काळजी घ्यावी, असे आवाहन नेत्रविकार तज्ञांनी केले आहे.

अशी घ्या डोळ्यांची काळजी

  • उन्हात बाहेर जाताना गॉगल आणि टोपी घाला.
  • कामाच्या दरम्यान अधूनमधून डोळ्यांवर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा.
  • डोळ्यात कोरडेपणा जाणवल्यास नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा.