ट्युमरने हृदय पोखरले देवदूत डॉक्टरने वाचवले, डोंबिवलीतील रुग्णावर अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

हृदयावर जणू दगड ठेवल्यासारखे वाटायचे. जेवणाची इच्छाच मेली होती. वजन घटत चालले होते, अशक्तपणा वाढला होता. सततच्या जुलाबांमुळे ते हैराण झाले होते. पण नेमका आजार कळत नव्हता. जगण्याची आशाच सोडली होती. अशा परिस्थितीत कार्डियाक सर्जन डॉ. बिजॉय कुट्टी त्यांच्यासाठी देवदूत बनून आले… टय़ुमर हृदय पोखरत असल्याचे निदान झाले. एक ब्लॉकेजही होते. डॉ. कुट्टी यांनी अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली आणि त्या रुग्णाचे प्राण वाचले.

डोंबिवलीतील रहिवाशी योगेश मेहता यांची ही कहाणी. मेहता यांच्या हृदयात लहान संत्र्याच्या आकाराचे टय़ुमर आणि एका ठिकाणी ब्लॉकेज असल्याचे निदान झाले. त्यांच्या हृदयात मायक्सोमा नावाचा टय़ुमर होता. टय़ुमर आणि ब्लॉकेज अशा दुहेरी समस्येने ते ग्रासले होते.

बिछान्यावर पडताच हृदय जड व्हायचे

मेहता यांना बिछान्यावर पडताच श्वास घेण्यासाठी प्रचंड त्रास जाणवायचा. अनेकदा तर मेहता बेशुद्ध पडायचे. मेहता यांनी गेल्या दोन महिन्यांत अनेक डॉक्टरांना दाखवले. परंतु कुणालाच कळत नव्हते की, नेमके काय झालेय. या कालावधीत टय़ुमर आणखी वाढले. डॉ. कुट्टी हे मेहता यांना देवासारखे भेटले आणि त्यांना नवजीवन मिळाले. त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. कुट्टी यांनी सांगितले.

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास

मेहता यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रासही होता. त्यात आजाराचे निदान होईपर्यंत टय़ुमर मोठा झाला होता. त्यामुळे धमन्यांवर दबाव पडला. परिणामी हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी झाल्याने चक्कर येऊ लागली. 23 मार्च रोजी ते चक्कर येऊन पडले होते. त्या वेळी त्यांना आयकॉन रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला गेला. आयकॉन रुग्णालयात डॉ. कुट्टी यांनी मेहता यांना काही चाचण्या करण्यास सांगितले तेव्हा हृदयात टय़ुमर असल्याचे आणि एक ब्लॉकेज आल्याचे निदान झाले.

मुलुंडच्या प्लॅटीनियम रुग्णालयात मेहता यांच्यावर तब्बल पाच तास शस्त्रक्रिया करण्यात आली. टय़ुमर काढण्यात आले. तसेच बायपास शस्त्रक्रियाही करण्यात आली. हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. मेहता यांना भविष्यात पुन्हा असा आजार होणार नाही. – डॉ. बिजॉय कुट्टी, कार्डियाक सर्जन