धारावी पुनर्वसन प्राधिकरणाने 25 कोटी रुपये भाडे थकवले, ‘म्हाडा’च्या नोटिसांना केराची टोपली

धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचे (डीआरपी) कार्यालय आता किंग्ज सर्कल येथील नव्या जागेत शिफ्ट झाले आहे. वर्षानुवर्षे ज्या म्हाडा मुख्यालयातील कार्यालयातून त्यांचा कारभार चालायचा त्या कार्यालयाचे 25 कोटी रुपयांचे भाडे मात्र डीआरपीने भरलेले नाही. म्हाडाने आतापर्यंत दोन वेळा नोटीस बजावूनही त्यांना डीआरपीकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे थकीत भाड्याच्या वसुलीसाठी म्हाडा काय अ‍ॅक्शन घेणार याकडे लक्ष लागले आहे.

धारावी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी राज्य सरकारने धारावी पुनर्वसन प्रकल्प प्राधिकरणाची स्थापना केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून डीआरपीचे कार्यालय म्हाडा मुख्यालयातील पाचव्या मजल्यावरील कक्ष क्र. 619 मध्ये होते. सात हजार चौरस फुटाच्या या प्रशस्त जागेसाठी म्हाडा दरमहा 265 रुपये प्रति चौरस फूट दराने भाडे आकारत होती. थकीत भाडे न भरताच दिवाळीपासून डीआरपीचे कार्यालय नव्या जागेत शिफ्ट झाले आहे.

थकीत भाडे आणि व्याजाची रक्कम मिळून डीआरपीने साडे पंचवीस कोटी रुपये भाडे थकवल्याचे समोर आले होते. सप्टेंबरपर्यंतची ही आकडेवारी असून थकीत भाड्यावरील व्याजाच्या रकमेत वाढ होत आहे. म्हाडाने डीआरपीला दोन वेळा नोटीस बजावली तरीही त्यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही, अशी माहिती म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने दिली.