
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारला चार महिन्यांचा कालावधी झाला; पण तीन पक्षांच्या या महायुती सरकारमधील नेत्यांची तोंडे तीन दिशेला आहेत. श्रेयवाद, मतभेद, धुसफुस, कुरघोडी, स्थगित्या, नाराजीनाटय़ अशी मालिका सुरू असताच या चार महिन्यांत शिंदे यांनी घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांना फडणवीस यांनी स्थगिती देऊन एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का दिला आहे. हिंदी भाषा सक्तीपासून एक राज्य एक गणवेश, परिवहन विभागासाठीच्या बसेसचा निर्णय आणि आता कश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना राज्यात परत आणण्यावरून शिंदे-फडणवीसांमध्ये युद्ध सुरू असल्याचे चित्र पुढे आले आहे.
महायुती सरकार स्थापन झाल्यापासून नाराजी नाट्य सुरू आहे. खातेवाटपापासून सुरू झालेला वाद अजूनही कायम आहे. त्यात पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांवरून वाद विकोपाला गेला. नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची, तर रायगडच्या पालकमंत्री पदावर अदिती तटकरे यांची नियुक्ती झाली; पण 48 तासांमध्ये या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदे गटाचे भरत गोगावले अडून बसले, तर दादा भुसे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी हट्ट करून बसल्याने या दोन जिह्यांच्या नियुक्त्या अद्यापपर्यंत होऊ शकलेल्या नाहीत.
आधारभूत किंमत योजनेत अनियमितता
शिंदे मुख्यमंत्री असताना किमान आधारभूत किंमत योजना व पीक खरेदी नोडल एजन्सीच्या निवडीला मान्यता देण्यात आली होती; पण फडणवीसांनी मुख्यमंत्री होताच योजनेतील अनियमितेवर बोट ठेवत नवीन धोरणासाठी समिती स्थापन केली आहे.
शिंदेंच्या योजनेला स्थगिती
शिंदे यांच्या काळात सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या यांत्रिकी कामांसाठी आरोग्य विभागाच्या 3 हजार 200 कोटी रुपयांच्या पाच वर्षांसाठी काढलेल्या निविदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आणि आरोग्य संस्थांना स्वच्छतेच्या संदर्भातील मागील कार्यपद्धती सुरू ठेवण्याचे आदेश दिले.
महामंडळाच्या बसेसना ‘ब्रेक’
एसटी महामंडळात एक हजार 310 बसेस भाडय़ाने घेण्याचा सुमारे 1 हजार 700 कोटी रुपयांचा प्रस्ताव होता; पण या योजनेत घोटाळा झाल्याचे उघड झाले. त्यामुळे या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली.
कश्मीर मदतीवरून श्रेयवाद
पहलगामध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्याच्या मुद्दय़ावरून महायुतीमध्ये श्रेयवाद उफाळून आला. राज्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी भाजपने वेगळी योजना आखली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळी व्यवस्था केल्याने महायुतीमधील मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत.
मिंधेंच्या आमदाराचा गृहखात्यावर हल्ला
महाराष्ट्र पोलीस हे जगात सर्वात अकार्यक्षम असल्याचे सांगत मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी गृहखात्याच्या कारभारावर हल्ला चढवत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केले आहे. दरम्यान, फडणवीस यांनी गायकवाड यांच्या बडबडीला लगाम घाला अशा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिल्या आहेत.
गणवेश योजनेचा शिंदेंना मोठा झटका
शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ‘एक राज्य एक गणवेश’चा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा रंगही निश्चित करण्यात आला. विधानसभेत शिंदे यांनी गणवेश व त्याचा दर्जा सर्व सदस्यांना दाखवला; पण फडणवीस सरकारने हा निर्णय बाजूला ठेवला. शाळेचा गणवेश ठरवण्याचे अधिकार संबंधित शाळा व्यवस्थापन समित्यांना दिले. ही योजना गुंडाळून फडणवीस यांनी शिंदेंना जोरदार झटका दिल्याचे स्पष्ट झाले.
हिंदीच्या सक्तीवरून यू टर्न
मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर केला; पण यावरून राजकीय गदारोळ झाला. हा निर्णय महायुतीच्या अंगलट येताच महायुती सरकारने यू टर्न घेतला आणि शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकातील ‘अनिवार्य’ हा शब्द काढून टाकण्यात आला.