फेरीवाल्यांना नाव, धर्म विचारून मारहाण; भाजपच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल, दादर पश्चिमेकडील संतापजनक घटना

तुम्ही मुस्लिम लोकांना कामाला का ठेवता? इथे बांगलादेशी मुस्लिमांना आसरा दिला जातोय का? मुस्लिमांना कामाला ठेवायचे नाही, असा दम देत माहीम विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी दादर पश्चिमेकडील काही फेरीवाल्यांना मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून हत्याकांड घडवले. यात 26 जणांचा नाहक बळी घेण्यात आला. यामुळे संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण आहे. असे असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी दादर पश्चिमेकडील फेरीवाल्यांना आपले टार्गेट केले. या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना त्यांचे नाव, धर्म विचारत मारहाण केली. मुस्लिमांना कामाला ठेवायचे नाही, बांगलादेशी मुस्लिम येथे बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याचे म्हणत स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत गोंधळ घातला.

अशी गुंडगिरी कशाला?

या प्रकारामुळे दादर पश्चिमेकडील फेरीवाले व दुकानदारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. कायद्यापेक्षा हे मोठे आहेत का? यांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला? काही असेल तर पोलिसांना सांगून कारवाई करा, पण अशा प्रकारे गुंडगिरी करणे योग्य नसल्याचा संताप फेरीवाले व नागरिकांनी व्यक्त केला. अखेर मिश्रा नावाच्या तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.