भिवंडीत फर्निचर गोदाम जळून खाक, एक जवान जखमी

भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात आगीचे सत्र सुरूच आहे. राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या फर्निचर गोदामाला पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागून मोठा भडका उडाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आग नियंत्रणात आणताना एक जवान जखमी झाला. अग्निशमन दलाने तत्काळ घटना स्थळी धाव घेत 12 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले.

राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील स्वागत गोदाम कॉम्प्लेक्स या ठिकाणी फर्निचर गोदामाच्या इमारतीला भीषण आग लागली. तीन मजली इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लायवूड, रेगझीन, फोम, केमिकल सोल्युशन साठवले असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या धुराचे लोट सुमारे 10 किलोमीटर अंतरावरून दिसत होते. आगीची माहिती मिळताच भिवंडीतील दोन तर कल्याण, ठाणे येथील प्रत्येकी एक अशा चार अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची तीव्रता इतकी होती की इमारतीमधील 12 गोदामांचा जळून कोळसा झाला. यात इमारतीचा काही भागही कोसळला.