
अभिनेता आमीर खानचा चित्रपट म्हटला की, बॉक्स ऑफिसवर कमाई ठरलेली. आमीरचा ‘दंगल’ म्हणजे जगभरात जास्त कमाई करणारा चित्रपट. अपवाद फक्त ‘लालसिंह चढ्ढा’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान बॉक्स.’ हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत. या पार्श्वभूमीवर आमीरने हिंदी चित्रपटांच्या एकूणच बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल भाष्य केले. आमीर म्हणाला, आपल्याकडे चित्रपटांना स्क्रीन जास्त मिळत नाहीत. चीनकडे आपल्यापेक्षा दहा पट जास्त स्क्रीन आहेत. स्क्रीनच्या जास्त संख्येमुळेच चिनी चित्रपट सुपरहिट ठरतात, कमाईचे उच्चांक गाठतात.
हिंदुस्थानची तुलना चीनसोबत करताना आमीर म्हणाला, मला वाटतंय आपल्याकडे अंदाजे 10 हजार स्क्रीन आहेत. त्यापैकी निम्म्या स्क्रीन दक्षिणेकडे आहेत. त्यामुळे जेव्हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा त्याला फक्त पाच हजार स्क्रीन मिळतात. दुसरीकडे चीनमध्ये तब्बल एक लाख पाच हजार स्क्रीन आहेत. याबाबत तुलनाच नाही. ‘दंगल’ चित्रपटाने 1300 कोटी कमावले. चीनमध्ये ही काही मोठी कमाई नाही. त्यांचे चित्रपट 4 ते 5 हजार कोटी रुपये कमावतात. कारण त्यांच्या लाखो स्क्रीन आहेत, आणि त्यांचे चित्रपट करोडो लोकांपर्यंत पोचतात. त्यामुळे चिनी चित्रपट हजारो कोटी रुपयांचा गल्ला जमवतात. परंतु बॉलीवूडच्या चित्रपटांना शंभर कोटींच्या क्लबमध्ये जाण्यासाठीही मोठी धडपड करावी लागते. यामागे स्क्रीनचा नक्कीच वाटा आहे.