
आईचा आशीर्वाद पाठीशी असेल तर अशक्य गोष्टही शक्य व्हायला वेळ लागत नाहीत. बिहारच्या रवीराजने हे सिद्ध करून दाखवले आहे. नवादा जिह्यात एका छोटय़ाशा महुली गावात राहणाऱ्या रविराजने दृष्टिहीन असूनही लोक सेवा आयोगाची कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रविराजला 184 रँक मिळाली आहे. दृष्टिहीन असूनही रविराजने आपल्या गावाचे नाव संपूर्ण देशात प्रकाशझोतात आणले आहे. जगात कोणतीही गोष्ट करणे शक्य आहे, हे त्याने जगाला दाखवून दिले आहे. शेतकरी रंजन कुमार आणि विभा सिन्हा यांचा रविराज मुलगा आहे. रविराजला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. रवीने याआधी बीपीएससी परीक्षेत 69 वी रँक मिळवली होती. त्याला महसूल विभागात अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली होती. परंतु रविराजने सुट्टी घेऊन यूपीएससीची तयारी केली होती. रविच्या या यशानंतर नवादाचे जिल्हाधिकारी रवि प्रकाश यांनी त्याची घरी जाऊन भेट घेत त्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रविराजने यूपीएससीत मिळवलेले यश हे एकटय़ाचे नसून संपूर्ण जिह्याचे आहे, अशा शब्दांत जिल्हाधिकाऱयाने त्याचे कौतुक केले. रविराजचे प्राथमिक शिक्षण नवादाच्या दयाल पब्लिक स्पूलमधून तर पदवीचे शिक्षण सीताराम साहू काॅलेजमधून पूर्ण केले.
आईच बनली दृष्टी
रविराज हा दृष्टिहीन आहे. त्याला दिसत नाही. तरीही त्याने सर्वांत अवघड असलेली यूपीएससीची परीक्षा व्रॅक करण्याचा निर्धार केला. यासाठी त्याला आईची मदत मिळाली. रविराजची आई विभा सिन्हा या मुलाची दृष्टी बनल्या. आईने त्याला यूपीएससीसाठी लागणारी सर्व पुस्तके वाचून दाखवली. त्यातला सारांश समजावून सांगितला. पुस्तकासोबतच यूपीएससीसाठी उपलब्ध असलेल्या यूटय़ुबवरील आवश्यक साहित्याची मदत घेण्यात आली. ज्यावेळी आई स्वयंपाक करायची त्यावेळी रविराज यूटय़ुबवरील लेक्चर ऐकायचा. मला जे आज यश मिळाले ते केवळ आई आणि वडिलांच्या आशीर्वादाने मिळाले आहे. आई नसती तर मला हे यश मिळणे शक्यच नव्हते. माझ्या यशात आईचा तितकाच वाटा आहे, असे रविराज म्हणाला.