
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निसर्गरम्य बैसरण व्हॅली 26 निष्पाप पर्यटकांच्या रक्ताने लाल झाली. या हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांपैकी एक आदिल अहमद थोकरही होता. या थोकरबाबत तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. थोकर 2018 मध्ये पाकिस्तानला गेला आणि सहा वर्षांनंतर तो तीन ते चार दहशतवाद्यांसोबत परतला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दहशतवादी आदिल थोकर हा जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरामधील गुरे गावचा रहिवासी. पहलगामच्या बैसरण व्हॅलीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या म्होरक्यांपैकी एक थोकर असल्याचे सांगण्यात येत आहे. आदिल अहमद थोकरने 2018 मध्ये गुरे येथील आपले घर सोडले आणि विद्यार्थी व्हिसावर पाकिस्तानला गेला. पाकला जाण्यापूर्वीच आदिल थोकरने कट्टरतावादाची चिन्हे दाखवली होती, असे गुप्तचर अधिकाऱ्यांचे मत आहे. हिंदुस्थान सोडण्यापूर्वीच आदिल हा सीमेपलीकडून कार्यरत असलेल्या आणि बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित व्यक्तींच्या संपर्कात होता, असे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानात पोहोचल्यानंतर आदिल थोकर लोकांच्या नजरेतून गायब झाला. त्याने त्याच्या कुटुंबाशीही संपर्क तोडला आणि जवळजवळ आठ महिने त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्याच्या डिजिटल फूटप्रिंटवर लक्ष ठेवणाऱ्या गुप्तचर संस्थांच्याही हाती तो लागला नाही. बिजबेहरा येथील त्याच्या घरावर लक्ष केंद्रीत केलेल्या समांतर देखरेखीच्या मोहिमेतही गुप्तचर विभागाला फारसे यश मिळाले नाही. आदिल थोकर यादरम्यान वैचारिक आणि निमलष्करी प्रशिक्षण घेत होता. तो पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) शी संबंधित हँडलर्सच्या प्रभावाखाली आला होता, असे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे.
आदिल अहमद थोकर 2024 च्या अखेरीस गुप्तचर यंत्रणेच्या निदर्शनास आला. पण यावेळी तो हिंदुस्थानात आढळला होता. थोकरने ऑक्टोबर 2024 मध्ये खडकाळ आणि दुर्गम पूंछ-राजौरी सेक्टरमधून नियंत्रण रेषा (LoC) ओलांडली. पूंछ-राजौरी सेक्टरमधील दुर्गम भागात गस्त घालणे अत्यंत कठीण आहे. उंच टेकड्या, घनदाट जंगलांचा वापर हिंदुस्थानात घुसखोरीसाठी होत आला आहे, अशी माहिती गुप्तचर सूत्रांनी दिली.
लंडनमध्ये हिंदुस्थानी नागरिकांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध, पाक अधिकाऱ्याकडून चिथावणीखोर कृत्य
काश्मीरमध्ये घुसल्यानंतर आदिल थोकर गावांपासून दूर राहिला आणि जंगल, डोंगराळ मार्गांचा वापर करून लपत राहिला. अनंतनागला जाण्यापूर्वी किश्तवाडमध्ये तो आढळून आला. अनंतनागमध्ये पोहोचल्यानंतर थोकर अंडरग्राउंड झाला. त्याने पाकिस्तानी नागरिकांसोबत घुसखोरी केली होती. त्यापैकी किमान एका पाकिस्तानी नागरिकाला कदाचित जंगलातील छावण्यांमध्ये किंवा गावातील एकाकी लपण्याच्या ठिकाणी आश्रय दिला होता, असे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे. 22 एप्रिलला दुपारी 1:50 च्या सुमारास थोकरसह हल्लेखोर बैसरण सभोवतालच्या घनदाट पाइन जंगलातून हत्यारांसह बाहेर पडले. आणि त्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. पहलगाममध्ये पाच दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची खात्रीशीर माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.