
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी थेट कारवाई करा असे आवाहन जगद्गुरु शंकराचार्य ज्योतिष्पीठाधीश्वर स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले. तसेच सरकारने पाकिस्तानचे पाणी बंद करणार अशी धमकी देण्यात काही अर्थ नाही हे खरंच शक्य आहे का असा सवालही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी विचारला.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, पहलगाममध्ये हिंदुवर झालेला हल्ला हा विचारपूर्वक होता. धर्म विचारून लोकांना मारलं हे क्रूरता आहे. दहशतवाद्यांनी सरळ सरळ युद्धासाठी चिथावणी दिली आहे. सरकारने याचा निषेध नव्हे तर धडक कारवाई करायला हवी, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.
तसेच सिंधू नदी करार तोडून सरकार जनतेला मुर्ख नाही बनवू शकत. ज्यांनी दहशतवादी हल्ला केला आधी त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. त्यानंतर सीमेपलीकडे बसलेल्या आकांना धडा शिकवण्यासाठी सरकारने युद्धाची तयारी केली पाहिजे. देशाची जनता सरकारसोबत आहे. सरकारकडून सतत पाकिस्तानचे पाणी बंद केले जाईल अशी धमकी दिली जात आहे. पण हे खरंच शक्य आहे का? पाणी बंद करण्याच्या धमकीमुळे दहशतवाद संपणार नाही. थेट कारवाई करावी अशी मागणीही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली.