
‘नाथबाबांच्या नावानं चांगभलं ‘च्या… जयघोषात आणि गुलाल-खोबऱ्याच्या मुक्तहस्ते उधळणीत ढगाळ वातावरणात खरसुंडी येथे सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेत सासनकाठी आणि पालखी सोहळा अमाप उत्साहात पार पडला. यात्रेत सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांनी नाथनगरीत हजेरी लावली.
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असणाऱ्या खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक खरसुंडीत गुरुवारपासूनच दाखल झाले होते. चैत्र वद्य दशमीला देवाची लोखंडी सासने धावडवाडीचे मुस्लिम व विठलापूरचे बाड यांनी स्नानासाठी घोडेखर येथे नेली. त्यानंतर ती जोगेश्वरी मंदिरात परत आणली. आज शुक्रवारी सकाळी सासनकाठी व पालखीने मिरवणुकीच्या सोहळ्यास सुरुवात झाली.
सकाळी अकरानंतर गावोगावच्या सासनकाठ्या मुख्य मंदिरात दाखल होऊ लागल्या. मंदिराच्या आवारात सासनकाठ्धा आल्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचवण्यात येत होत्या. दर्शनासाठी आलेले भाविक सासनकाठीवर गुलाल व खोक्ऱ्याची मुक्त उधळण करीत होते. दुपारी एक वाजता नाथ निमंत्रक नयाबा गायकवाड यांचे वंशज प्रथम मानकरी गायकवाड बंधू यांना पुजारी बांधव मंदिरात घेऊन येतात. नंतर आटपाडीचे मानकरी देशमुख यांना घेऊन येण्यासाठी पुजारी व गायकवाड जातात. त्यांना मंदिरात घेऊन आल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
अग्रभागी मंदिरातील पुजारी धुपारती, सेवेकरी, मानकरी, भालदार, चोपदार अशा पारंपरिक व शाही थाटात लवाजम्याने पालखीसह प्रस्थान केले. नगारखाना प्रवेशद्वारातून पालखी तीन वाजता मुख्य पेठेत दाखल झाल्यावर भाविकांनी चांगभलंच्या गजरात गुलाल खोबऱ्याची एकच उधळण केली.
यावेळी मुख्य पेठेसह संपूर्ण आसमंत गुलाबी दिसत होता. मुख्य पेठेतून गुलाल खोबऱ्याची उधळण झेलत पालखी सोहळा जोगेश्वरी मंदिरात पोहोचला. तत्पूर्वी महादेव मंदिराच्या प्रांगणात सर्व सासनकाठ्या पालखीला टेकवून सलामी देण्यात आली. जोगेश्वरी मंदिरात पानसुपारी झाल्यानंतर प्रथेप्रमाणे टकऱ्या घडशी यांनी सासनकाठीला टक्कर दिली व पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. या वेळी पालखीसोबत देवाच्या लोखंडी सासनकाठ्या होत्या.
चांगभलंच्या गजरात पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर श्रीफळ वाढवण्यास सुरुवात झाली. यात्रा शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी देवस्थान समिती, ग्रामपंचायत, बाजार समिती, महसूल व पोलीस प्रशासन, सेवेकरी-मानकरी यांनी परिश्रम घेतले. यात्रेनिमित्त जनावरांच्या बाजारात विक्रमी आवक झाली असून, खरेदी-विक्रीस सुरुवात झाली आहे. शनिवारी दुपारी ‘श्रीं’चा रथोत्सव होणार