
रुग्णाच्या नातेवाईकांनी बिल न अदा केल्याने मृतदेह अडवून ठेवण्याच्या घटना आजवर अनेक रुग्णालयांत घडल्या आहेत; मात्र, बिल भरण्यास तयार असूनही केवळ बिलिंग करण्यासाठी कर्मचारी नसल्याने आठ तास मृतदेह अडवून ठेवल्याची धक्कादायक घटना पूना हॉस्पिटलमध्ये घडली. एकीकडे आपल्या माणसाच्या जाण्याच्या असा यातना भोगत असतानाच हॉस्पिटलच्या या भोंगळ कारभाराचा मनस्तापही नातेवाईकांना सहन करावा लागला.
शुक्रवार पेठेतील महेश पाठक (वय – 53) यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि. २५) रात्री दीड वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी बिल भरून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हॉस्पिटलकडे चौकशी केली असता तुमच्या रुग्णावर महापालिकेच्या शहरी गरीब योजनेअंतर्गत उपचार सुरू होते. त्यामुळे तुम्हाला सकाळी साडेआठ वाजता बिल भरून मृतदेह नेता येईल, असे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. परंतु, योजनेचे जे काही बिल असेल ते आम्ही भरतो. मृतदेह आमच्या ताब्यात द्या, पैशांसाठी मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून आम्ही सकाळपर्यंत वाट बघत बसायची का? अशी विचारणा केली असता यावेळी बिलिंग करायला कोणी नाही, तुम्हाला सकाळी यावे लागेल, अन्यथा बिलाची पूर्ण रक्कम भरा आणि मृतदेह घेऊन जा नंतर महापालिकेकडून या योजनेचा लाभ घ्या, असे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले.
सकाळी साडेआठ वाजता पुन्हा नातेवाईक हॉस्पिटलमध्ये आले व त्यांनी बिल करून मृतदेह ताब्यात देण्याविषयी विचारले, तेव्हाही हॉस्पिटलने तुम्हाला साडेनऊपर्यंत थांबायला लागेल. वरिष्ठ अधिकारी अधिकारी आले की त्यांची फाईलवर सही होईल व नंतर तुम्हाला बिल भरता येईल असे सांगत पुन्हा आमची अडवणूक केली. तुमची काही तक्रार असेल तर वरिष्ठ आल्यावर त्यांना सांगा नाहीतर पूर्ण बिल भरून मृतदेह घेऊन जा, असेच आम्हाला सांगण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
हॉस्पिटलकडूनच येणे बाकी
मृतदेह ताब्यात घेताना बिल किती झाले, याबाबत हॉस्पिटलकडे चौकशी केली असता त्यांनी तुम्हालाच सात हजार परत द्यायचे आहेत. तुम्ही आता मृतदेह घेऊन जा आणि नंतर रिफंडची रक्कम घ्यायला या, असे हॉस्पिटलकडून सांगण्यात आल्याचे मृत रुग्णाचे नातेवाईक नीलेश महाजन यांनी सांगितले.
आरोग्य विभागाकडे तक्रार
योजनेचे बिल भरायला तयार असूनही याबाबत सकाळीच कार्यवाही होऊ शकते, असे सांगत आठ तास मृतदेह अडवून ठेवला. त्याबाबत मी महापालिकेच्या तक्रार निवारण कक्ष येथे फोनवर तक्रार दिली आहे. तसेच महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांनाही याबाबत लेखी तक्रार दिली असल्याचे नीलेश महाजन यांनी सांगितले.
प्रशासनाने मदत केल्याचा रुग्णालयाचा दावा
संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांनी आम्हाला शहरी गरीब योजनेतून उपचार पाहिजे असे सांगितले होते. रात्रीच्यावेळी शहरी गरीब योजनेचे ऑनलाइन पोर्टल बंद असते. रुग्णालय प्रशासनाने त्यांना मदत केली. रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचारी यांच्यामध्ये काय विसंवाद झाला याची माहिती घेण्यात येईल, असे पूना हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले.