पहलगाम हल्ल्याचा आणि गुजरातच्या मुंद्रा बंदरावर आढळलेल्या ड्रग्जचा थेट संबंध! NIA चा सर्वोच्च न्यायालयात दावा

गुजरातच्या मुंद्रा बंदरात 21 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. या ड्रग्जचा आणि पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा थेट संबंध असल्याचा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने केला आहे. तसेच हे ड्रग्ज लश्कर ए तोयबाच्या ड्रग रॅकेटचा भाग असून या माध्यमातून हिंदुस्थानला खिळखिळा करण्याचा डाव असल्याचेही तपाससंस्थेने म्हटले आहे.

महाधिवक्ता ऐश्वर्या भाटी सर्वोच्च न्यायालयात म्हणाल्या की पहलगामध्ये दहशतवाद्यांनी हिंदुस्थानींचा जीव घेतला. टॅल्क स्टोन सांगून अफगाणिस्तानवरून हिंदुस्थानात हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज आणले गेले. दिल्लीच्या कबीर तलवारने हे ड्रग्ज नेब सराई आणि अलिपूरमध्ये ठेवलं होतं. या ड्रग्जचा संबंध लश्कर ए तोयबाशी असल्याचे भाटी यांनी सांगितले.

राष्ट्रीय तपाससंस्थेने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की अफगाणिस्तानमधील अंमली पदार्थाचे तस्कर पाकिस्तानच्या आयएसआयची आणि इराणी तस्करांची मदत घेतात. यांच्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपयांचे तीन हजार किलो ड्रग्ज हिंदुस्थानात आणले गेले. या ड्रग्जच्या माध्यमातून जे पैसे मिळणार होते ते पैसे दहशतवादी हल्ल्यासाठी वापरले जाणार होते असे राष्ट्रीय तपास संस्थेने म्हटले आहे.