
पहलगाममध्ये झालेल्या निष्पाप पर्यटकांच्या निघृण हत्याकांडाचा सर्वत्र निषेध होत आहे. निरपराध लोकांचे बळी घेणाऱ्या आतंकवाद्यांचा त्यांच्या घरात शिरून खात्मा करण्याची मागणी मुस्लीम समाजाने केली आहे. मुंब्रा, खर्डी, पालघर, पनवेल येथे मुस्लीम समाजाने पाकिस्तान पुरस्कृत दशतवाद्यांविरोधात तीव्र निदर्शने केली.
दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो मुंब्रावासीयांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध केला. कौसा जामा मशीद, रिझवी बाग मस्जीद, तनवीर नगर, रशीद कंपाऊंड येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, ‘हमारी जान… हिंदुस्थान’ अशा घोषणांनी मुस्लीम बांधवांनी परिसर दणाणून सोडला. मुस्लीम महिलांनी अतिरेक्यांच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीला जोड्याने मारले. याप्रसंगी शमीम खान, शानू पठाण यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
खडर्डी येथील मुस्लीम बांधवांनी एकत्र येत अतिरेक्यांच्या कारवाईचा तीव्र निषेध करत निदर्शन केली. मुस्लीम बांधवांनी हाताला काळ्या फिती बांधून कादरी मस्जिदमध्ये नमाज पठण केले. यावेळी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या हत्याकांडातील हल्लेखोर आणि त्यांच्या आश्रयदात्यांवर केंद्र सरकारने तत्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पनवेलमधील दाऊदी बोहरा समाजाने आतंकवादी हल्ल्याचा निषेध केला. अंजुमन-ए-नजमी जमात कमिटीच्या वतीने फलक हाती घेऊन दहशतवादी भ्याड हल्ल्याचा निषेध केला. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते. पालघरमधील जामा मशिदीसमोर नमाज अदा केल्यानंतर मुस्लीम बांधवांनी दहशतवादाविरोधात जोरदार निदर्शने केली. पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी करून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.