
>> प्रसाद ताम्हनकर
जुलै 2023 मध्ये अमेरिकेच्या एका संसदीय समितीला अमेरिकन नौसेनेच्या काही लढाऊ विमानांनी अवकाशात चित्रित केलेले तीन व्हिडीओ दाखवण्यात आले. वेगवेगळ्या वेळी चित्रित केलेल्या आणि काहीशा धूसर असलेल्या या व्हिडीओमध्ये एक चमकती गोलाकार वस्तू उडताना दिसत आहे. खरे तर या घटना 2020 मध्ये चित्रित करण्यात आल्या होत्या. हे व्हिडीओ आधी अनधिकृतरीत्या लीकदेखील झाले होते. जगभरात या व्हिडीओने खळबळ माजली होती आणि परग्रहवासी दुसऱया ग्रहावर जीवनाचे अस्तित्व यांची जोरदार चर्चा सुरू झाली होती. ही घटना पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे केंब्रिजमध्ये कार्यरत असलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या प्राध्यापिका निक्कू मधुसूदन आणि त्यांच्या चमूने लावलेला नवा शोध. संशोधकांच्या या चमूला K2-18B या ग्रहाचा अभ्यास करत असताना जीवनाच्या अस्तित्वाच्या खुणा सापडल्या आहेत.
K2-18B या ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करत असताना संशोधकांच्या या तुकडीला असे काही रेणू सापडले आहेत जे फक्त पृथ्वीवर आढळतात आणि सूक्ष्म जिवांमुळे निर्माण होतात. नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपद्वारे हे संशोधन करण्यात आले आहे. परग्रहावर जीवनाच्या अस्तित्वाच्या या खुणा सापडल्या असल्या तरी ठोस असा काही निष्कर्ष काढण्यासाठी अधिक अभ्यासाची आणि माहितीची गरज असल्याचे प्राध्यापक मधुसूदन यांनी स्पष्ट केले आहे. येत्या एक ते दीड वर्षांत या जिवांच्या अस्तित्वाविषयी स्पष्टपणे काही बोलता येईल, असे त्यांनी सांगितले. संशोधकांना या ग्रहावर डाय मिथाईल सल्फाइड आणि डाय मिथाईल डायसल्फाईड या वायूंचे रासायनिक ठसे आढळले आहेत. पृथ्वीवर हे रेणू समुद्रात राहणाऱया सूक्ष्म जिवांकडून तयार केले जातात. पृथ्वीवर या रेणूचे प्रमाण एक अब्जामध्ये एक इतके कमी आहे, तर या ग्रहावर हे प्रमाण पृथ्वीच्या हजार पट जास्त आहे.
K2-18B हा ग्रह पृथ्वीच्या अडीच पट मोठा असून तो पृथ्वीपासून 700 ट्रिलियन मैल अर्थात 124 प्रकाश वर्षे इतका दूर आहे. या ग्रहावर असलेले रेणूचे प्रमाण बघता, हा ग्रह पूर्णपणे द्रवाने भरलेला असावा आणि त्याच्या वातावरणात हायड्रोजनचे प्रमाण जास्त असावे असादेखील अंदाज संशोधकांनी लावला आहे. या ग्रहावरील एकूण वातावरणाचा अभ्यास करता, इथे जीवन फुलू शकते असे त्यांना वाटते. मात्र हा अभ्यास ‘संशोधकांनी लावलेला शोध’ या शब्दांपर्यंत पोहोचत नाही. संशोधकांना एखाद्या गोष्टीची 99.99999 टक्के खात्री असायला हवी. शास्त्रीय भाषेत सांगायचे तर संशोधकांचे निकाल हे ‘पाच सिग्मा’पर्यंत जाऊ शकतात, तर सध्या K2-18B ग्रहावरून काढलेले निष्कर्ष हे तीन सिग्मापर्यंत म्हणजे अचूकतेच्या बाबतीत 99.7 टक्के इतके आहेत. मात्र ही टक्केवारीदेखील आशादायक असल्याचे काही संशोधकांचे मत आहे. सध्या तरी जगभरातील खगोल शास्त्रज्ञांनी यावर फारसे काही भाष्य करण्याचे टाळल्याचे दिसते.
काही शास्त्रज्ञांच्या मते अंतराळात अनेकदा अनेक अनोख्या गोष्टी घडत असतात. ज्या वायूच्या रेणूसंदर्भात ही चर्चा चालू आहे. तो वायू पृथ्वीवर फक्त सूक्ष्म जिवांमुळे तयार होतो हे खरे असले तरी K2-18B ग्रहावर तयार होणारा असा वायू जैविक क्रियेमुळे तयार होतो आहे असा कोणताही स्पष्ट पुरावा सध्या तरी मिळालेला नाही. काही शास्त्रज्ञ तर प्रयोगशाळेत निर्जीव वातावरणात डायमिथाईल सल्फाईड आणि डायमिथाईल डायसल्फाईड तयार करता येते का, याचा अभ्यास करत आहेत. त्यांच्या या शोधाला यश मिळाल्यास K2-18B संदर्भातील दाव्याला मोठा धक्का बसू शकतो. जगभरातील संशोधक दोन गटांमध्ये विभागले गेले असले तरी प्राध्यापक मधुसूदन आणि त्यांच्या चमूला आपण योग्य मार्गावर असल्याच्या विश्वास आहे. पृथ्वीच्या बाहेर जीवन आहे का? या प्रश्नाचे ठाम उत्तर देण्यासाठी विज्ञानाचे अनेक पर्वत चढावे लागतील आणि त्यासाठी आपली तयारी असल्याचे ते सांगतात. येणाऱया काळात त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो आणि मानवासाठी अंतराळातील एक नवी सृष्टी उजेडात येवो अशा संपूर्ण हिंदुस्थानतर्फे त्यांना शुभेच्छा.