ऋतूरंग – ग्रीष्माचा कुसवा

>> प्रा. विश्वास वसेकर

ग्रीष्मात हमखास चाहूल लागते ती पावसाळ्याची! मान्सूनचे प्रगतीपत्रक उन्हाळ्यापासून सुरू होते. जेवढा मोठा प्रखर उन्हाळा तेवढा पावसाळा जास्त म्हणून ऊन खायचे. अमलताशाने सुखी व्हायचे. शर्बती रंगाचा थंडावा अनुभवायचा. आंब्याची रास घरात लावत आमरसाची तृप्ती चाखायची. अशा या ग्रीष्माच्या कुशीत पावसाळा असतो म्हणून त्याचे सगळे डोहाळे पुरवायचे.

‘पावसाळा रोगी, हिवाळा भोगी अन् उन्हाळा योगी!’  असं म्हटलं जातं. रवीन्द्रनाथ टागोरांनीसुद्धा आपल्या एका कवितेत ग्रीष्म हा असा एक कठोर तपस्वी दाखविला आहे की जो आपला श्वास रोखून येणाऱया नवजीवनाची मार्गप्रतीक्षा करीत आहे. मला मात्र असं मुळीच वाटत नाही. ग्रीष्म ऋतू माझ्यासाठी सुखाची किती तरी दारं उघडून मला आत घेत असतो. ग्रीष्म ऋतूत चाललेल्या सगळ्या हालचालीत मला आंबा महोत्सव थोर वाटतो. अक्षय्य तृतीयेला त्याचं उद्घाटन होतं आणि जोरदार पाऊस येईपर्यंत तो अखंडपणे चालू राहतो. पावसाळा सुरू झाला आणि कोयीसालीवर हिरव्या माश्या बसायला लागल्या की आंबा महोत्सव थांबवायचा असतो. आंब्याचे दिवस म्हटले की मला वस्सा या गावचं माझं बालपण आठवतं. साहीखडीचं माप आठवतं. त्यात शंभर म्हणजे एकशे तेहतीस आंबे यायचे. माझे चुलत आजोबा गंमत म्हणून सकाळी सकाळी आंब्यांची दलाली करायचे. म्हणजे एखाद्याच्या डालीचा भाव ठरवून ती विकून द्यायचे. प्रत्येकाचा आंबा माचायचे. थोडा घेऊन बाकी सगळा मला द्यायचे. मी त्यांच्या मागंमागंच असे. शेवटी त्यांना कमिशन म्हणून खूप आंबे मिळायचे. रोज रस व्हायचा.

आंब्याचा रस सेवन करण्याची आमची एक खास गावंढळ पद्धत होती. वाटय़ांत किंवा द्रोणांत रस ओतून झाला की आजा ओरडायचे, ‘हं, पोरंहो, लावा घोडे पव्हणी’ की मग आम्ही तळव्याच्या अग्रभागाचा पळीच्या आकाराचा ‘खोल्या’ करून, फुर्र फुर्र आवाज करीत रस ओरपायचो. पोळी रसात बुडवून, तो तुकडा कुठलाही आवाज होऊ न देता खाणं हा आंब्याचा अपमान आहे.

एकदा माझे प्राचार्य डॉ. कोठेकरांकडे रसाळी होती. फुरका न मारता रस खाणं किती अरसिकपणाचं आहे हे मी सांगत होतो. तेव्हा त्यांनी फार महत्त्वाची माहिती दिली. आपल्या जिभेमध्ये काही केंद्र अशी आहेत की जी फक्त फुरका मारल्यावरच स्त्रवतात! कोठेकरांच्या या पाठिंब्यामुळे माझ्या फुरकाधिष्ठित रसपानाला एक शास्त्राrय परिमाण मिळालं. जेवणात आंब्याचा रस असेल तर बाकी काही फारसं लागत नाही. पिठलं असलं तरी बास! कुरवडय़ा पापडय़ा असतील तर उत्तम. मला रसात थोडं गावरान तूप टाकलेलं आवडतं. लोक पुरणाच्या पोळीबरोबर, भाकरीसोबत आणि भातात कालवूनही आंब्याचा रस खातात म्हणे! त्यांना माझा दुरूनच नमस्कार.

ग्रीष्मातला आणखी एक चवींचा उत्सव म्हणजे आइक्रिमचा. जालन्याला चिन्मयी सुर्वेने मला चांगलीचुंगली आइक्रिम खाऊ घालून सांगितलं, ‘काका, ह्याचे दीडशेच्या वर प्रकार आहेत.’ तेव्हा मी नाना रूपे धारण करणाऱया त्या लीलाधराच्या क्रीडेने केवढा प्रभावित झालो होतो. अंबाजोगाईत एका संध्याकाळी तलत मेहमूदच्या आवाजात श्रीनाथ तिवारीने मला व्याकूळ हाक घातली, ‘काका, शामे आइक्रिम की कसम’ मीही त्या दिवशीची मोठी, उणीव कबूल केली, ‘आज आइक्रिमगीन है हम’ आणि मग त्याला आइक्रिम खायला नेलं. ग्रीष्म हा रसवंती आणि ज्यूस सेंटर्सचाही हंगाम आहे.

गुदमरून टाकणारे हे कडक ऊन

पंख्यांचा विक्रेता चालला आहे

जणू झुळुकांनी भरलेले गाठोडे घेऊन

शिकी नावाच्या कवीचा किती सुंदर हायकू आहे हा. गुदमरून टाकणारं कडक ऊन आहे म्हणून तर थंड झुळुकांचं अपार सुख आहे. ते नसतं तर हेही नसतं. बघा, कशी गंमत आहे ती! ऋतू बदलला की पूर्वी अनुकूल वाटणाऱया संवेदना प्रतिकूल होतात. हिवाळ्यात हवी असते ऊब आणि उन्हाळ्यात हवा असतो गारवा. गारवा ग्रीष्मात सुखाचं दार होऊन येतो.

उन्हाळा वाढायला लागला की आपण गेल्या वर्षी अडगळीत टाकलेला कुलर झटकून बाहेर काढतो. त्याचे पडदे बदलतो आणि मग अनुभवतो गारव्याचा प्रियाळ स्पर्श. आपण थोडे श्रीमंत असलो तर हे पडदे वाळ्याचे आणू शकतो. तसं झालं तर मग संवेदनांचा एक अनोखा संकर सुरू होतो. सुगंध आणि शीतलता. वाळ्याच्या सुगंधाचे सहचरी भाव असे उन्हाळ्याशी निगडित आहेत.

ग्रीष्मात कुलरसारखंच सुख असतं शॉवर बाथचं. आपल्याकडे शॉवर असले की आंघोळीच्या संख्याही आपसूक वाढत राहतात. सगळ्यात शेवटची आंघोळ झाली  बियरपान सुरू करावयाचे. बियरपान वगैरे समजा निषिद्ध मानलं तरी जलपानाचा केवढा सोहळा चाललेला असतो उन्हाळ्यात! नवा माठ आणणं, त्याचं नवेपण जाईपर्यंत पाणी पिण्याचा संयम बाळगणं, तरीही उन्हाळ सर्दी होणं, थंड पाण्याला वाळ्याने गंधित करणं, कधी तरी हा वाळा खराब होतो, मग तो फेकून देणं, मग माठात मोगऱयाची फुलं टाकून पाण्याला त्याचा स्वाद देणं. पाण्यात काहीतरी टाकल्याशिवाय उन्हाळ्यात मजा नाही!

पाण्यात काहीही टाकून साखर ढवळली की सरबत होतं. या सरबतांची समृद्ध दुनिया ग्रीष्मातच भेटायला येते. कोकमचं सरबत, खसचं सरबत, वाळ्याचं सरबत, काजूचं सरबत, रुहे आफजा! यांचा बहुधा रंग फिकट गुलाबी, लालसर असतो. म्हणून या रंगछटेला उर्दूत नाव आहे, शर्बती!

उन्हाळ्यात गच्चीवर झोपण्याचं सुखही काही औरच असतं. गच्चीवर आधी पाणी शिंपडायचं. न कंटाळता अंथरुण पांघरुण वर न्यायचे. जेवणसुद्धा गच्चीवरच घ्यायचे. मानवी मनाला अशा फुरसतीच्या क्षणाची सदैव प्रतीक्षा असते.

या गर्मियों की रात जब पुरवाईयाँ चले

ठंडी सफेद चादरों पे जागें देर तक

तारों को देखते रहे छत पर पडे हुए

दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के 

रात दिन

नक्षत्रांकित आकाशाकडे आपलं खऱया अर्थाने लक्ष जातं ते गच्चीवर झोपल्यावर. इतकं निवांतपणे आकाश निरीक्षण एरवीच्या धकाधकीत कोण करतो? आपण करायचं!

एवढय़ा उन्हाळ्यात फुलणारे गुलमोहर आणि अमलताश हे सृष्टीतले महामानवच म्हणावे लागतात. दोघांचेही रंग भडक तरीही कमालीचे सुखावह. अमलताशसाठी मराठीत बहावा शब्द आहे. त्याचं एक नाव सुवर्णिका असं आहे. बंगालीत त्याला ‘सोनाली’ म्हणतात हे वाचून तर मी हरखून गेलो. प्रा. रंगनाथ तिवारींच्या ‘बेगम समरू’ कादंबरीमध्ये अमलताशचं सुंदर वर्णन आहे. गुलजारची अमलतास शीर्षकाची मोठी कविता आहे. तो एका गाण्यात म्हणतो, ‘तुझं नाव जर का गुलमोहर असतं तर या संबंध वसंताला फुलविण्याची जबाबदारी तुझीच राहिली असती.’ गुलमोहर वसंताच्या शेवटी फुलतो आणि पावसाळ्यापर्यंत नेत्रसुख देतो.

ग्रीष्मात एक चाहूल मात्र हमखास यावीच लागते. म्हणजे अपरिहार्यच असते ती… पावसाळ्याची! मान्सूनची प्रगती आपण वर्तमानपत्रात वाचत असतो. जेवढा मोठा प्रखर उन्हाळा तेवढा पावसाळा जास्त म्हणून ऊन खायचं. ग्रीष्माच्या कुशीत पावसाळा असतो म्हणून त्याचे सगळे डोहाळे पुरवायचे. बा.भ. बोरकरांची ‘ग्रीष्माचा कुसवा’ नावाची सुंदर कविता आहे.

कोरडय़ा पात्रांना ग्रीष्म घालतो धिंगाणा

ठायी ठायी पोचे मात्र तांब्याबिंदल्यांना

म्हणू नका असे आज वाऱया लागे पिसे

पाल्या-पाचोळ्यात त्याच्या गार-खुळ्या

ताना

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)