पाऊलखुणा – शिवचरित्राचा मागोवा

>> रोहित पवार

परदेशी प्रवाशांची भारतात येण्याची परंपरा ही काही नवीन नाही. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारातील ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिसपासून ते अल्बेरुनी, ह्युएन संग, जगप्रसिद्ध इब्न बतुता आणि अद्भुत मार्को पोलोपर्यंत अगणित प्रवाशांनी या भूमीला भेट दिली. त्यांच्या कुतूहलाने भरलेल्या नजरेत ज्या ज्या गोष्टी आल्या, त्या त्यांनी नोंदविल्या. त्यांच्या नोंदी इतिहासाच्या अभ्यासकांना भूतकाळातील घटनांचा पडदा उलगडण्यास मार्गदर्शक ठरतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जाणून घेताना या परदेशी प्रवाशांच्या नोंदी तितक्याच महत्त्वपूर्ण ठरतात.

‘कुतूहल’… माणसाला जगण्याची प्रेरणा देणारा हा शब्द. दगडी हत्यारे बनविणाऱ्या अश्मयुगीन माणसाने पुढे चंद्रावर पाऊल ठेवले. हा संपूर्ण प्रवास या कुतूहलाचाच. युगानुयुगे याच कुतूहलाने प्रेरित होऊन मानवाने अज्ञात क्षितिजांचा वेध घेतला आहे. पलीकडचे जग कसे असेल? तिथले लोक कसे असतील, त्यांची संस्कृती, त्यांची जीवनशैली आपल्यापेक्षा वेगळी असेल का? अशा अगणित प्रश्नांनी मानवी मनात काहूर उठवले आणि याच अतृप्त जिज्ञासेपोटी काही धाडसी माणसे आपल्या ज्ञात जगाच्या सीमा ओलांडून अज्ञात वाटा तुडवत निघाले.

समुद्रांच्या लाटांवर स्वार होऊन आणि दूरवरच्या दुर्गम भूभागांना तुडवत हे प्रवासी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. त्यांच्यापैकी काही भारतभूमीकडेही आले. परदेशी प्रवाशांची भारतात येण्याची परंपरा ही काही नवीन नाही. चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारातील ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिस पासून ते अल्बेरुनी, ह्युएन संग, जगप्रसिद्ध इब्न बतुता आणि अद्भुत मार्को पोलोपर्यंत अगणित प्रवाशांनी या भूमीला भेट दिली. त्यांच्या कुतूहलपूर्ण नजरेत ज्या ज्या गोष्टी आल्या, त्या त्यांनी नोंदविल्या. असे काही क्षण नोंदवून ठेवण्याच्या त्यांच्या सवयीतून त्यांनी तत्कालीन भारताचे जे चित्र रेखाटले, उद्या त्या नोंदींकडे जग ‘इतिहास’ म्हणून बघणार आहे याची बहुतांशी प्रवाशांना जाणीवही नसावी. त्यांच्या नोंदी इतिहासाच्या अभ्यासकांना भूतकाळातील घटनांचा पडदा उलगडण्यास मार्गदर्शक ठरतात. ते केवळ प्रवासी नव्हते तर ते भूतकाळाचे साक्षीदार होते!

शिवकाळात अनेक परकीय प्रवासी महाराष्ट्रात येऊन गेले. यात काही  प्रवासी होते, काही वैद्य, काही धर्मप्रसारक, काही व्यापारी तर काही अधिकारी लोकसुद्धा. काही जण थोडे दिवस इथे राहिले तर काही कायमचेच या भारतभूमीशी एकरूप झाले. या लोकांनी  ज्या घटनांची, व्यक्तींची नोंद केली त्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत आणि ही सर्व माहिती अपरिचित तर आहेच, पण महत्त्वपूर्णदेखील आहे. शिवाजी महाराज हयात असतानाच त्यांची कीर्ती दूर युरोपपर्यंत पोहोचली होती. त्यांच्या पराक्रमी कार्यांनी, धाडसी कृत्यांनी आणि चलाखीने समकालीन परदेशी इतिहासकारांच्या लेखनात स्थान मिळवले होते. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि इटालियन लेखक मराठय़ांचे नाव जगात प्रसिद्ध होण्याआधीच शिवाजी महाराजांचे वर्णन करत होते. त्यापैकी काही जणांनी ओळखले होते की, शिवाजी महाराज हे  फक्त बंडखोर सरदार नव्हते तर ते एक थोर सेनानी आणि त्याहूनही महान राजनीती धुरंधर होते.

या बुद्धिमान निरीक्षकांमुळेच आपल्याला या मराठा वीराची सर्वात जुनी चरित्रे उपलब्ध आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक वेळी अचूक माहिती किंवा निष्पक्ष इतिहासाची अपेक्षा करता येत नाही, परंतु त्यांनी आपल्यासाठी अनेक रंजक किस्से, तेव्हाच्या चर्चा आणि ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या अशा काही सत्य घटनांचा  खजिना जतन करून ठेवला आहे. तब्बल 100 वर्षांपूर्वी बंगालचे साक्षेपी इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांनी ‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी’ हा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये अशाच परकीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या नोंदींचा समावेश केला होता.

इतिहासाचा अभ्यास करत असताना माझ्या मनात सारखे यायचे की, सेनांचे हे ‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी’ हे पुस्तक एक वेगळी दृष्टी देणारे आहेच, परंतु ते इंग्रजीतच राहिल्याने अपरिचित राहिले आहे. जर हे मराठीमध्ये असते तर किती सोपे झाले असते आणि मग विचार आला की, हे काम आपणच का करू नये? म्हणून मग मी सदर पुस्तकाच्या अनुवादाच्या कामाला लागलो. या पुस्तकात परकीय लोकांनी केलेल्या समकालीन नोंदी आहेत, यात संक्षिप्त-दीर्घ अशी शिवचरित्रेही आहेत. त्यामुळे हा ग्रंथ अन्य कोणत्याही ग्रंथांप्रमाणे भावानुवाद करून चालणार नव्हते. साधन ग्रंथांचे भाषांतर काटेकोरपणे करून तो साधन ग्रंथाप्रमाणेच मांडणे आवश्यक होते. अखेरीस ‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ गेल्या महिन्यात 15 मार्च 2025 रोजी प्रकाशित झाला.

या पुस्तकात ‘कॉस्मी द ग्वार्द’ याने लिहिलेले पोर्तुगीज भाषेतील शिवचरित्र आहे, जे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या पंधराच वर्षांत लिहिले होते. या पोर्तुगीज शिवचरित्रात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख आहे. शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना भरघोस पगार देत ही गोष्ट या शिवचरित्रात नोंदवली आहे. पुढे या पुस्तकात फ्रांस्वा व्हॅलेंटाइन या डच अधिकाऱ्याची नोंद आहे, जी शिवाजी महाराजांनी केलेल्या सुरत लुटीचा वृत्तांत सांगते. महाराज कसे दिसायचे, याचे वर्णन करणारा फ्रेंच प्रवासी ‘थिवेनो’ याचाही समावेश पुस्तकात केला आहे.

‘अॅबे कॅरे’ हा फ्रेंच प्रवासी शिवकाळात भारतात येऊन गेला. तो शिवाजी महाराजांच्या प्रदेशातून प्रवास करत असताना त्याची मराठा अधिकाऱ्याशी भेट झाली. या चर्चेदरम्यान त्याने अत्यंत महत्त्वाच्या नोंदी करून ठेवल्या आहेत. कोकणातून प्रवास करताना या कॅरेने टिपलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न आणि हेरगिरीचे रहस्य वाचण्यासारखे आहे. रायगडावर राज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला पार पडला. या सोहळ्याचा साक्षीदार हेन्री ऑक्सिडेन हा त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याची रोजनिशी या पुस्तकात दिली आहे. याशिवाय सध्या चर्चेत असणारी ‘मार्टिनची डायरी’देखील या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. या डायरीत शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय या अतिशय महत्त्वाच्या मोहिमेच्या घटनांचा समकालीन वृत्तांत वाचायला मिळतो. याशिवाय अनेक अप्रकाशित डच पत्रांचासुद्धा समावेश या पुस्तकात केला आहे.

आज मराठय़ांच्या इतिहास संशोधनाला सुरुवात होऊन एक शतकाहून अधिक काळ लोटला आहे. इतिहासाचार्य राजवाडे, का.ना. साने, मेहेंदळे, परांजपे आदी मंडळीनीं मराठय़ांच्या इतिहासाशी निगडित कागदपत्रे शोधून त्यांची चिकित्सा केली. पुढे ग.ह. खरे,  द.वा. पोतदार, आप्पासाहेब पवार आदी मंडळींनी तो वारसा पुढे चालवला. सध्याच्या काळात गजानन मेहेंदळे, डॉ. उदय कुलकर्णी यांसारखे इतिहासकार अविरतपणे इतिहासाचे कार्य पुढे नेत आहेत,  ‘जिथे पुरावा नाही तिथे इतिहास नाही’ हे ब्रीद आम्हाला शिकवणारे, अवघ्या महाराष्ट्राला आपल्या वाणीने समृद्ध करणारे इतिहास तज्ञ निनाद बेडेकर यांना हा ग्रंथ मी अर्पण केला आहे. या पुस्तकामागची प्रेरणाही तेच आहेत. ‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती’ हा अस्सल साधन ग्रंथ असल्याने येणाऱ्या पिढय़ांना, इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांना हा ग्रंथ नक्कीच उपयोगी ठरणार आहे.

[email protected]

(लेखक इतिहास संशोधक आहेत.)