
खासदार सुनील तटकरे यांच्या घरच्या पाहुणचारासाठी केलेल्या कोट्यवधींच्या खर्चावरून टीकेची झोड उठताच सार्वजनिक बांधकाम विभागाने रोह्याच्या सुतारवाडीतील हेलिपॅडचे कंत्राटच रद्द केले. मात्र टेंडर मंजूर होण्याआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणाच्या आशीर्वादाने सुतारवाडीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी हेलिपॅड उभारले, असा सवाल करण्यात येत आहे. याबाबत शिवसेनेने आवाज उठवला असून या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे.
किल्ले रायगडावरील शिवपुण्यतिथी कार्यक्रमानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाहुणचारासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील घरी गेले होते. यासाठी रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे तब्बल दीड कोटींचा खुर्दा करून चार हेलिपॅड उभारण्यात आले होते. मात्र ‘गीताबागे’तील या जेवणावळीसाठी गेलेल्या शहांसाठी सरकारी पैशांची उधळपट्टी करण्यात आल्याने टीकेची झोड उठली. दैनिक ‘सामना’ने 19 एप्रिल रोजी ‘अमित शहांच्या हेलिपॅडसाठी दीड कोटींचा खुर्दा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महाड येथील कार्यकारी अभियंत्यांनी हेलिपॅडची निविदाच रद्द केल्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याबाबत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाड विधानसभा उपजिल्हा समन्वयक व शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. त्यांनी लोकायुक्त, महालेखा निबंधक, रायगडाचे जिल्हाधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
माहितीच्या अधिकारात मागविली माहिती
शिवसेनेचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज केला असून बांधकाम विभागाकडून काही माहिती मागविली आहे. यामध्ये हेलिपॅडसाठी जाहीर केलेल्या निविदा, आदेश, बांधकाम नेमके कधी सुरू केले, कामासाठी जिल्हाधिकारी-तहसीलदार यांनी दिलेली परवानगी, सुतारवाडीत झालेला कार्यक्रम शासकीय होता की खासगी, किती खर्च करण्यात आला, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे. त्यामुळे हेलिपॅडसाठी झोलझपाट करणाऱ्या बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.